उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस
आज एकनाथ शिंदेंनी सुनील राऊत यांना फोन करुन संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.


Published : November 11, 2025 at 6:16 PM IST
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळं त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना फोन केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्र काढून आपली तब्येत ठीक नसल्यामुळं आपण पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनातून विश्रांती घेत असून, नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असं म्हटलं होतं. यानंतर भांडुपमधील फोर्टीज रुग्णालयात उपचारांसाठी संजय राऊत दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांनी फोन केले. तसंच सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट करत, लवकर बरे व्हा..., अशी प्रार्थना केली होती.
लवकर बरे व्हा... : 2022 रोजी मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर संजय राऊत दररोज निशाणा साधत होते. याला प्रत्त्युत्तर म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही संजय राऊत यांच्यावर टीका केली जात होती. मात्र, आता संजय राऊत यांची तब्येत ठिक नसल्याचं समजताच राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी देखील संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना फोन केला. यावेळी फोनवरुन एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच, "संजय राऊत यांना सांगा की, लवकर बरे व्हा...," असा निरोप एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना दिला.
पंतप्रधानांची पोस्ट, मुख्यमंत्र्यांनंतर आता शिंदेंचा फोन : संजय राऊत हे दररोज सकाळी केंद्र आणि राज्य सरकारवर, भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधत होते. तसंच यादरम्यान, ते शिवेसना (उबाठा) यावेळी ते आपल्या पक्षाची भूमिका मांडत असत. पण 31 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं होतं. या पत्रात "सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे की, मी ठणठणीत बरा होऊन साधारणत: नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर भांडुपमधील फोर्टीज रुग्णालयात उपचारांसाठी ते दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांनी फोन केले. याशिवाय, संजय राऊतांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. यानंतर आज एकनाथ शिंदेंनी सुनील राऊत यांना फोन करुन संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.

