ETV Bharat / state

'अख्खा महाराष्ट्र मला घाबरतो, मात्र माझ्यावर लाडकी दादागिरी करणारा आमदार कोण?' अजित पवारांनी दिलं उत्तर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहिल्यानगरमध्ये प्रचारसभा झाली.

SHIRDI AJIT PAWAR
प्रचारसभेत बोलताना अजित पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 28, 2025 at 8:14 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. "महाराष्ट्र मला घाबरतो. मी भेटणार नाही असं सांगितलं तर दादांचा मूड आता ठीक नाही. त्यामुळं नंतर भेटू असं नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणतात. परंतु आशुतोष काळे माझ्यावर दादागिरी करतो. त्याची दादागिरी मी सहन करतो आणि यापुढेही सहन करत राहीन. कारण ती लाडानं केलेली दादागिरी आहे. आनंदानं मी आशुतोषची दादागिरी सहन करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

दादा मीटिंगमध्ये असले तरी मला तत्काळ बोलायचे : "महाराष्ट्रासह कोपरगावात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी कोपरगावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी मला संपर्क केला. त्यावेळी मी अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचं माझ्या पीएनं सांगितलं. मी पीएला नंतर बोलतो असं सांगितलं. मात्र आशुतोष म्हणाला की, दादा मीटिंगमध्ये असले तरी मला तत्काळ बोलायचं आहे. मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे. त्यानंतर मी आशुतोषचा फोन घेतला आणि माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या," असं अजित पवार यांनी सांगितलं.

कुत्रे, बिबट्यांना काय धिंगाणा घालायचा तो तिकडं घालू द्या : कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री आहेत. जाईन तिथं चावत आहेत. त्यांना पकडून त्यांची नसबंदी करून जंगलात नेऊन सोडायचं आहे. बिबटे पण फार झालेत. त्यामुळं बिबट्या आणि कुत्र्यांनी काय धिंगाणा घालायचा तो तिकडे जंगलात घाला आमच्याकडं येऊ नका. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे, अजित पवार यांनी सांगितलं.

... त्यानं दंड भरून जनावर घेऊन जावं : "जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. किती जनावरे मोकाट फिरत आहेत. त्यामुळं कोंडवाडे तयार करावे लागतील. माझ्याही बारामतीत अशी घटना घडली होती. यावर काही लोक न्यायालयात जातात. मोकाट जनावरे मारून चालणार नाहीत. त्यामुळं त्यांना कोंडवाड्यात ठेवावं. ज्याचं जनावर असेल त्यानं दंड भरून जनावर घेऊन जावं. त्यामुळं कोणी जनावरे मोकाट सोडणार नाही. जी जनावरे मोकाट आहेत आणि कोणाच्या मालकीची नसतील ती गावावर ओवाळून टाकलेली असतील अशांना उचलून जंगलात नेऊन सोडावं लागेल," असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. "2 लाख 90 मतदारांची मूळ जागा बदलण्यात आली, जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबन करा"-अंबादास दानवे
  2. "...तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू", ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर निशाणा
  3. "मामा-भांजे फौज तो तेरी सारी है, स्टेजपर बैठे 31 तुमपे भारी है,"; सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर निशाणा