दिल्ली स्फोट प्रकरण : कोणी घडवून आणला स्फोट ? : डीएनएमधून बाहेर आली धक्कादायक माहिती
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी कार चालवणारा डॉक्टर उमर नबी असल्याचं स्पष्ट केलं. डीएनए चाचणी 100 टक्के जुळल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितलं.


Published : November 13, 2025 at 11:00 AM IST
|Updated : November 13, 2025 at 11:06 AM IST
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसर स्फोटात आतापर्यंत तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्फोटाच्या घटनास्थळावरुन गोळा केलेल्या नमुन्यांच्या डीएनए चाचणीतून हा स्फोट कोणी घडवून आणला, याबाबतची माहिती उघड झाली आहे. या गाडीत डॉक्टर उमर नबी हा असल्याचं उघड झाल्याची माहिती गुरुवारी पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळावरुन गोळा केले नमुने : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानं देशभरात मोठी खळबळ उडाली. हा स्फोट झालेल्या घटनास्थळावरुन सुरक्षा यंत्रणांनी नमुने गोळा केले आहेत. त्यासह डॉक्टर उमर नबी याच्या भाऊ आणि आईचे नमुने घेऊन मंगळवारी सुरक्षा यंत्रणेनी त्यांची तपासणी केली. हे नमुने 100 टक्के जुळल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे. "डीएनए तपासणीतून डॉक्टर उमर नबी हाच स्फोट झालेली गाडी चालवत होता, हे स्पष्ट झालं आहे," असं वृत्त वृत्तसंस्थेनं सुरक्षा यंत्रणेतील सूत्राच्या हवाल्यानं दिलं आहे.
गाडीच्या अवशेषातून जमा केले हाडांचे तुकडे : सुरक्षा यंत्रणांनी डॉक्टर उमर नबी हाच गाडीत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी उमर नबी याच्या आई आणि भावाचे नमुने डीएनएसाठी घेतले होते. यबाबत बोलताना सुरक्षा यंत्रणांतील सूत्रांनी सांगितलं की, "त्याचा डीएनए नमुने त्याच्या आई आणि भावाच्या डीएनए नमुन्याशी 100 टक्के जुळले आहेत. त्यामुळे स्फोटाच्या वेळी तो गाडीत उपस्थित होता, याबद्दल कोणतीही शंका उरली नाही. कारच्या तुटलेल्या अवशेषांमधून सापडलेल्या हाडांचे तुकडे, दात आणि कपड्यांचे तुकडे यातून काढण्यात आले." असंही या सूत्रांनी सांगितलं.
डॉक्टर उमर हा व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य : उमर हा या 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा एक प्रमुख सदस्य होता. तो जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा इथल्या कोइल गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी संबंध असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. यानंतर तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक केलं. मात्र डॉक्टरला अटक झाल्यानंतर काही तासातच सोमवारी संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट झाला.
दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश : सुरक्षा यंत्रणांनी पर्दाफाश केलेलं दहशतवादी मॉड्यूल जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेलं असल्याचं स्पष्ट झालं. या दहशतवादी मॉड्यूलचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर तब्बल 3,000 किलोग्राम अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त करण्यात आलं. लाल किल्ल्याभोवती असलेल्या उच्च सुरक्षा क्षेत्रात झालेल्या या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेनं घेतला तपास हाती : या घटनेनंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून अधिकृतपणे तपास हाती घेतला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी परिसराला वेढा घातला. एनआयए अधिकाऱ्यांनी स्फोटकांचे अवशेष, वाहनांचा भाग आणि डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. उमर त्या दिवशी त्याच्या फरीदाबाद इथल्या निवासस्थानातून निघून गेला होता. त्यानं त्याच्या सहकाऱ्यांना दिल्लीत एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं.
हरियाणात सापडली आणखी एक कार : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचे धागेदोरे आता हरियाणापर्यंत पोहोचले आहेत. हरियाणातील फरिदाबाद पोलिसांनी लाल किल्ला परिसर स्फोट प्रकरणाशी संबंधित असलेली लाल रंगाची फोर्ड कार जप्त केली आहे. ही कार डॉक्टर उमर नबी याच्या नावावर असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी कार जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :

