'तांबे, लोटे फेकून द्या'; एकनाथ शिंदे यांची मामा-भाच्यावर टीका, शिंदे धावत सभास्थळी पोहचले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी संगमनेरमध्ये आले होते. सभास्थळी येण्यास वेळ लागत असल्यानं शिंदे हे विमानतळावरुन धावत निघाल्याचं दिसून आलं.

Published : November 28, 2025 at 10:12 AM IST
अहिल्यानगर : संगमनेरची जनता ढाण्या वाघ आहे. विधानसभा निवडणुकीत जो पंजा मारला तो पाहून संगमनेर नगरपालिका निवडणुकीतून पंजा गायब झाला. एकच मारा पण सॉलिड मारा जेणेकरुन संगमनेरातून पंजा गायब झालाय. आता सगळीकडून पंजा गायब होईल आणि मेणबत्ती लावून तो शोधण्याची वेळ येईल. संगमनेरच्या जनतेनं एकच बोका मारला आणि सगळे गपगार झाले, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
संगमनेरात ढाण्या वाघाचा वावर : संगमनेर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका केली. "चाळीस वर्ष सत्ता भोगली, पण आता संगमनेरात ढाण्या वाघाचा वावर सुरू झालाय," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नगरपालिकेचा वापर राजकारणाचा अड्डा : "गेली चाळीस वर्षे सत्ता असलेल्यांची अमोल खताळ यांनी मक्तेदारी संपवली. नगरपालिका निवडणुकीत देखील त्याची पुनरावृत्ती होणार आहे," असंही शिंदे म्हणाले. "स्वतःची हॉस्पिटल चालवण्यासाठी सरकारी हॉस्पिटल बंद पाडले. गेल्या चाळीस वर्षे संगमनेर नगरपालिकेचा वापर राजकारणाचा अड्डा म्हणून करणाऱ्यांचे राज्य आता संपवायचे आहे. घराणेशाहीची मक्तेदारी बंद करायची आहे," अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यावर केली.
तांबे, लोटे सगळे फेकून द्या : "मामा-भाचे एकच आहेत, जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाहीत ते तुम्हाला कसे सांभाळतील? मत मागायला येतात आणि नंतर विसरून जातात. मी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी संगमनेरात आलो नाही, तर संगमनेरच्या विकासाचा शब्द द्यायला आलोय," असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "इथे काही लोक माझ्या नावाचा वापर करतात. माझ्याशी चांगले संबंध असल्याचं सांगतात. पण, त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. 'जो नहीं राम का, वो नहीं काम का'," अशा शब्दांत शिंदे यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यावर टीका करत "आता तांबे, लोटे सगळे फेकून द्या" असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी जवळीक असल्याचा दावा आमदार सत्यजित तांबे वारंवार करतात. मात्र, शिंदे यांनी थेट संगमनेरात येऊन केलेल्या वक्तव्याने तांबे यांच्या दाव्याची एक प्रकारे हवाच काढली आहे.
हेही वाचा -
- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाकारले, तर निधी नाही; अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कशी केली सारवासारव?
- माझं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस जात नाही; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
- 'एकनाथ शिंदे भाजपाविरोधात भूमिका घेणार...'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

