‘डहाणू फेस्टिव्हल’मधून नगरपरिषदेची माघार, स्वयंसेवी संस्था आयोजक असल्यानं संभ्रम
वेगवेगळ्या भूमिकांमुळं एकूणच ‘डहाणू फेस्टिव्हल’ बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Published : February 28, 2026 at 11:27 AM IST
पालघर - डहाणू येथे 20 ते 22 मार्च दरम्यान ‘डहाणू फेस्टिव्हल’ होणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी पत्रकार परिषदेत केली होती; परंतु मुख्याधिकारी अक्षय गुडघे यांनी या फेस्टिव्हलमध्ये नगरपालिकेचा संबंध केवळ ना हरकत दाखला देण्यापुरता मर्यादित असल्याचे सांगितल्याने नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव समोर आला आहे. आता ‘डहाणू फेस्टिव्हल’बाबत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे या फेस्टिव्हलबाबत संभ्रम निर्माण झाला असून, स्थानिकांना रोजगार मिळेल, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष माच्छी यांनी पत्रकार परिषद घेऊन डहाणू येथे 20 ते 22 मार्च दरम्यान डहाणू महोत्सव होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात डहाणू नगरपालिका, लायन्स क्लब आणि रोटरी क्लबचा सहभाग असल्याचे त्यांनी जाहीर केले होते; परंतु डहाणू येथे झालेल्या जनता दरबारात डहाणू महोत्सवाबाबत नगरपालिकेची भूमिका काय असणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी ‘डहाणू फेस्टिव्हल’ नगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
आदिवासी समाजाला रोजगाराच्या संधी मिळणार का? - यंदाच्या डहाणू महोत्सवात नगरपालिकेचा सहभाग असणार नाही. हा महोत्सव स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आयोजित केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व आदिवासी समाजाला प्रत्यक्ष या डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळणार, की नाही हा प्रश्नच आहे. ‘डहाणू फेस्टिव्हल’ मध्ये नगरपालिकेचा सहभाग नसल्याने या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या दुकाने व स्टॉलचे दर सर्वसामान्य स्थानिक नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे असल्यास स्थानिक उद्योजकांना, व्यावसायिकांना या महोत्सवात सहभागी होता येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
‘डहाणू फेस्टिव्हल’चा उद्देश - ‘डहाणू फेस्टिव्हल’चा मूळ उद्देश स्थानिक नागरिक व आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिकांच्या कला-गुणांना व्यासपीठ देणे, पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक व आदिवासी खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा होता. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थांनी हा महोत्सव आयोजित केल्यास त्यात व्यावसायिकता येण्याची जास्त शक्यता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलविषयी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, आयोजकांनी ‘डहाणू फेस्टिव्हल’चा नेमका उद्देश काय, स्थानिक आदिवासींसाठी कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर दुकाने व स्टॉलचे दर काय असणार याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
महिला बचत गटांना प्राधान्य असणार का? - मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिका या महोत्सवात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आयोजित या महोत्सवात महिला बचत गटांना प्राधान्य असणार, की नाही हेही स्पष्ट व्हायला तयार नाही. त्यामुळे एकूणच ‘डहाणू फेस्टिव्हल’ बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा -
- मराठी माणसांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा; गुजराती लोकांनी मुंबईत यावं हा सिद्धांत नाही; पालकमंत्री गणेश नाईक यांचा सल्ला
- पालघर जिल्ह्यात मद्य तस्करी, दमण आणि दीवच्या स्वस्त दारूला महाराष्ट्राचं बनावट लेबल, 5 जणांवर गुन्हा दाखल
- विकासकामांमुळं पालघरमधील रस्त्यांची दुरवस्था, आमदार राजेंद्र गावित यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम!

