ETV Bharat / state

शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण

कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक आणि त्यांचे सहकारी यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

Shiv Sena Shinde Group
महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 7:07 PM IST

|

Updated : July 7, 2026 at 7:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन महिला नर्सना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. याप्रकरणातील आरोपींवर 18 तास उलटूनही गुन्हा दाखल करण्यात नसल्यानं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



महिला डॉक्टर आणि नर्सला रुग्णालयात घुसून मारहाण : डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधींच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन नर्स यांना मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही पकडून ठेवल्याचा आरोप आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले असून, "आमच्यावर आणखी किती अन्याय करणार?" अशी संतप्त आणि आर्त भावना त्यांनी व्यक्त केली.

माहिती देताना मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सादिया पिंजारी (ETV Bharat Reporter)



काय आहे प्रकरण? : रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी रात्री आठच्या दरम्यान दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली की, जन्मानंतर बाळाला 'एनआयसीयू' (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) उपचारांची आवश्यकता भासू शकते. विशेष म्हणजे शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स आधीच भरलेले असल्यानं, बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीनं दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला. याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचं रुपांतर पुढे थेट डॉक्टर आणि नर्सवरील हल्ल्यात झालं.

"शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बेड्स उपलब्ध नसताना डॉक्टरांनी रुग्णाच्या चांगल्यासाठीच दुसरा सल्ला दिला होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असा हल्ला खपवून घेतला जाणार नाही." - सादिया पिंजारी, मुख्यआरोग्य अधिकारी



डॉक्टर-कर्मचाऱ्यांचं रुग्णालयात कामबंद आंदोलन : मारहाणीच्या घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं 'कामबंद आंदोलन' सुरू केलं आहे. "यापूर्वीही अनेकदा डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील नर्ससोबत अशा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. अशा असुरक्षित वातावरणात डॉक्टरांची काम करण्याची मनस्थिती राहिलेली नाही," अशी भावना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला आणि वैद्यकीय सेवा व्यक्ती संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, पोलीस तपास अधिकारी पाटील यांनी दिली.

हेहा वाचा -

  1. मराठी गुजराती वाद : मीरा भाईंदरमध्ये मनसेचा 8 जुलैला मोर्चा, तर मुख्यमंत्री म्हणतात भाषेवरून गुंडगिरी खपवून घेणार नाही
  2. अब्दुल सत्तार यांचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; म्हणाले 'एकाला घरी बसवलं, दुसऱ्याला सिल्लोडमध्ये गुंडगिरी दिसते, आता मीच . . . .'
  3. ठाकरे गटाकडून जोगेश्वरीत गुंडगिरी, राड्याप्रकरणी अनंत नर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Last Updated : July 7, 2026 at 7:46 PM IST