'नगरपालिका निवडणुकीप्रमाणं शिवसेनेला महापालिका निवडणुकीत यश मिळेल'- मंत्री भरत गोगावले
श्रद्धा-सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून वर्षाकाठी कोट्यवधी भाविक शिर्डीत येत असतात. तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मंत्री गोगावले यांनी आज सहपरिवार साईबाबांचे दर्शन घेतले.

Published : December 30, 2025 at 2:31 PM IST
|Updated : December 30, 2025 at 2:50 PM IST
शिर्डी : महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. एक दिवस उमेदवार अर्ज भरण्याचा आणि अर्ज छाननीसाठी एक दिवस जाणार असल्यानं मंत्री भरत गोगावले देवदर्शन घेत आहेत. 2 जानेवारीपासून 14 जानेवारीपर्यंत प्रचारात राहणार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
सहपरिवार घेतलं साईबाबांचे दर्शन : दरवर्षी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी न चुकता येत असलेले मंत्री गोगावले आज सहपरिवार साईबाबांचं दर्शन घेऊन शनि शिंगणापूर, तुळजापूर, पंढरपूर आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहेत. 2 जानेवारीपासून ते प्रचारात उतरतील. "देवाला दरवेळी मागतो. कधीही अपयश आलं नाही. नगरपालिका निवडणुकीत कशा पद्धतीने यश शिवसेनेला मिळालं, ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. तसंच यश महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळणार आहे", असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.
जिथे युती होईल तिथे लढू : महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष युती करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी भाजपाची शिवसेनेबरोबर युती झालेली नाही. यावर मंत्री गोगावले म्हणाले, "प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अशा अनेक ठिकाणी युती जुळली आहे. ज्यांची ताकद जास्त आहे, ते जास्त जागा मागणार आहेत. पण, जिथे युती होईल तिथे लढू. जिथे युती होणार तेथेही आम्ही लढणार आहोत. आमची ताकद नवीन मुंबईत आहे. आमचा एक खासदार आहे. भाजपाचे दोन आमदार आहेत. मागील वेळी 42-54 चा फॉर्म्युला होता. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमची युती होण्याची शक्यता होती. युती झाली नाही, तर आम्ही तिथे मैत्रीपूर्ण स्वबळावर लढू."
संजय राऊतला ओळखणार कोण? : संजय राऊत यांच्यावर टीका करतांना मंत्री गोगावले म्हणाले, "खाल्याचा थरावर टीका करण्याशिवाय संजय राऊतला ओळखणार कोण? त्यांची अशी अवस्था झाली आहे. पुढे यापेक्षा जास्त दुरावस्था होणार आहे. आम्ही प्रामाणिक काम करत आहोत. जिथे आम्ही चुकतो, तिथे आम्हाला सांगा. आम्ही मागे जाऊ. पण जिथे आम्ही चुकत नाही तिथे झुकणार नाही."
उद्धव ठाकरेंवर केली टीका : "जातीपातीचं राजकारण कधी शिवसेनेने केलं नव्हतं आणि करणारही नाही. आम्ही सर्वांना पुढे घेऊन चालत आहोत. बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळीदेखील इतर भाषिक लोक होते. परंतु आता विरोधक काहींना काही राशन-पाणी पाहिजे म्हणून ते घेऊन चालले आहेत", अशी टीका गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
पराभव काही लोकांना पचवता येत नाही : रायगड येथील हत्या प्रकरणावर बोलतांना मंत्री गोगावले म्हणाले, "आरोप-प्रत्यारोप झाले. कारण त्यांचे काही नेते मंडळी त्यांना खतपाणी घालत आहेत. काही लोकांना पराभव पचवता येत नाही. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचा काय दोष होता? आरोपींनी सांगितलं की, आम्हाला दोनवेळा हरवलं. याचा अर्थ त्यांना पराभव पचवता आला नाही. पराभव पचवता येत नसेल तर निवडणुकीत उभे राहू नका. हत्या करणं योग्य आहे का? नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे."
महाविकास आघाडीवर केली टीका : दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काही ठिकाणी एकत्र येत आहेत का? यावर गोगावले म्हणाले, "काही ठिकाणी त्यांना पर्याय नसेल तर ते तसेच करू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात किंवा तिघे एकत्र येऊ शकतात. आम्ही शिवसेना-भाजपा खांद्याला खांदा लावून काम करतो. आम्ही जिंकणार आहोत. महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सभा होतील. तशाच शिवसेनेच्या महायुतीच्या सभाही होणार आहेत. आम्ही काम करतोय, त्याचा मोबदला मागत आहोत. विरोधक काम करत नाहीत. ते घरात बसून टीका करतात. कोण मोबदला देणार?" अशी टीका गोगावले यांनी महाविकास आघाडीवर केली.
हेही वाचा -
- कोल्हापुरात महायुतीचं जमलं, भाजपा मोठा भाऊ, तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा? जाणून घ्या
- विधानसभा अध्यक्षांच्या कुटुंबातील तिघांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी; राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता यांनी काय म्हटलं?
- अमरावती महापालिका निवडणूक : शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांपासून लपवला जागावाटपाचा फॉर्म्युला, शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी

