ETV Bharat / state

2 बालविवाह रोखण्यात पुणे पोलिसांना यश; नवरदेव, वरबाप, वरमाय, भटजीसह 10 जणांवर गुन्हा

दौंडमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं हाणून पाडला. या प्रकरणी नवरदेव, वरबाप, वरमाय, भटजीसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cops Stop two Child Marriages
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 5:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : दौंड तालुक्यातील पाटस इथं 2 अल्पवयीन मुलींचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं हाणून पाडला. या प्रकरणी मुलीचे आई-वडील, मुलाकडील नातेवाईक तसेच मंगल कार्यालयाचे मालक अशा एकूण 10 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे.

Cops Stop two Child Marriages
यवत पोलीस ठाणे (ETV Bharat)

पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात बालविवाह : मिळालेल्या माहितीनुसार, 7 जुलै रोजी सायंकाळी दौंड तालुक्यातील पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली. याबाबत माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी पोलीस पथकास तत्काळ विवाहस्थळी जाण्यास सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर विवाहासाठी आलेल्या नागरिकांकडं चौकशी करण्यात आली. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह सुरू असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी संबंधित मुलींच्या पालकांकडून जन्मदाखल्यांची, आधारकार्डांची तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यांची पडताळणी केली. त्यामध्ये एका मुलीचा जन्म 31 जानेवारी 2009 तर दुसऱ्या मुलीचा जन्म 7 सप्टेंबर 2010 असल्याचं स्पष्ट झालं.

पालकांसह मंगलकार्यालयाच्या मालकावर गुन्हा : तपासादरम्यान मुलींचे पालक, वधू-वर, त्यांचे पालक, तसेच मंगल कार्यालयाच्या मालकाची चौकशी करण्यात आली. दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी विवाह सोहळा थांबवून मुलींना आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणलं. या कारवाईमुळे दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह रोखण्यात यवत पोलिसांना यश आलं.

10 जणांवर गुन्हा दाखल : या प्रकरणी या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत, हे माहीत असतानाही त्यांचा संपत धोंडीबा बरकडे आणि रामदास माणिक बंडगर यांच्याशी बालविवाह लावून देण्यात येत असताना आढळून आला. या प्रकरणी मुलीचे वडील संतोष नानवर, आई सोनाली नानवर, नवरदेव मुलगा संपत धोंडीबा बरकडे, नवरदेवाचे वडील संपत धोंडीबा बरकडे, आई बायजाबाई बरकडे, नवरा मुलगा रामदास माणिक बंडगर, त्याचे वडील माणिक बाबुराव बंडगर, आई हौसाबाई माणिक बंडगर, भटजी हरिभाऊ शाळू, त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे मालक प्रशांत भागवत यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत कलम 9, 10 आणि 11 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कठोर कारवाई करण्यात येणार : याबाबत दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितलं की, "पोलीस पथकास 2 बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. याबाबत 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. यातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे."