ETV Bharat / state

थेट दिल्लीतील हायकमांडचा हस्तक्षेप अन् बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसची माघार

काँग्रेस उमेदवाराने बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक झाली तर ती एकतर्फीच होईल असं स्पष्ट होतय.

Sunetra Pawar
सुनेत्रा पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 9, 2026 at 3:12 PM IST

|

Updated : April 9, 2026 at 5:03 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. त्यामुळं बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. प्रमुख विरोधी उमेदवारांपैकी काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोन सुरू होते, अखेर आज काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार मी माघार घेतली : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतल्याची घोषणा केली. “वरिष्ठांच्या आदेशानुसार मी माघार घेत आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, मोरे यांच्या या निर्णयापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीतून काँग्रेस माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आता मोरे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केल्यानं या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार लढत उभी राहील, अशी अपेक्षा असतानाच हा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया देताना आकाश मोरे (ETV Bharat Reporter)



दिल्लीतील हायकमांडचा हस्तक्षेप : काँग्रेसच्या या निर्णयामागे थेट दिल्लीतील हायकमांडचा हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि निरीक्षक रमेश चेन्निथला यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं आकाश मोरे यांनी सांगितलं. प्रदेश नेतृत्वातील सपकाळ यांनीच मोरे यांना माघारीचे निर्देश दिल्याची माहिती आहे. दरम्यान लढण्याच्या तयारीत असलेल्या आकाश मोरे यांनी अचानक घेतलेली माघार ही कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. “जड अंतःकरणाने विड्रॉ घेतो,” असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्यानं स्थानिक पातळीवरील अस्वस्थता उघड झाली आहे.


माघार घेतली असली तरी हा शेवट नाही : या निवडणुकीत मोरे यांना महादेव जानकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा होती. मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील ही गोष्ट स्पष्ट केली. यामुळं बारामतीत पारंपरिक राजकारणाबाहेर ‘तिसरी आघाडी’ उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र माघारीनंतर हा प्रयोग सध्या थांबलेला दिसत आहे. माघार घेतली असली तरी हा शेवट नसल्याचा संकेत आकाश मोरे यांनी दिला आहे. बारामतीत काँग्रेस स्वतंत्रपणे ताकद उभी करणार आणि आगामी निवडणुकांसाठी आक्रमक मोर्चेबांधणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बारामतीतील काँग्रेसची ही माघार केवळ एका उमेदवाराचं ‘विड्रॉल’ नसून, ती महाविकास आघाडीतील शिस्त, समन्वय आणि भविष्यातील राजकीय रणनीतीचे द्योतक आहे. आता या निर्णयाचा फायदा आघाडीला होणार की स्थानिक नाराजी उलट परिणाम करणार? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासमोर कोण उभं : बारामती पोटनिवडणूकीतून अखेर काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीकडून एकही उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोर नसणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून काँग्रेसला ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेस पक्षाला ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. परंतु काँग्रेस पक्ष त्यांच्या मतावर ठाम होता.

काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला : सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच दिवशी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळं सकाळपासूनच अनेक घडामोडी घडत होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत होते. पार्थ पवारांच्या शपथविधीसाठी गेलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना विनंती केली. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची मुंबईत सकाळी भेट घेऊन विनंती केली होती. सर्व घडामोडींनंतर अखेर काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला.



म्हणून बारामतीतील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला : याबाबत अधिकृत घोषणा करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं, “अजित पवारांच्या मृत्यूनंतर ही होणारी पोटनिवडणूक आहे. अजित पवारांनी बरीच वर्षे काँग्रेससोबत सत्तेत आणि विरोधात होते. हे असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती सातत्याने राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाकडून करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनीही स्वतः फोनकरून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राची परंपरा म्हणून बारामतीतील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.”



रोहित आणि जय पवारांनी काँग्रेसचे मानले आभार : काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून काँग्रेस पक्षाचे आभार मानले. सुनेत्रा पवार या एक लाखांपेक्षा जास्त फरकाने निवडून येतील असा विश्वास व्यक्त अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागे दाखवलेल्या सामंजस्याच्या भूमिकेसाठी आभार मानले. त्याचबरोबर अजूनही काही अपक्षांचे अर्ज मागे घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे मानले आभार : याचबरोबर काँग्रेस पक्षाने अधिकृत घोषणा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. रोहित पवार यांनी एक्सवर याबाबत भूमिका स्पष्ट करताना म्हटलं, “अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही बारामतीकरांसह संपूर्ण राज्यातील जनतेची भावना होती. दादांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशीही सर्वांची भूमिका होती. या भावनेचा आदर ठेवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला, याबद्दल काँग्रेस पक्ष, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला तसेच राज्यातील सर्व काँग्रेस नेते आणि उमेदवार आकाश मोरे यांचे मनःपूर्वक आभार. या निर्णयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमच्या पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.” तसेच, उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसकडून अजितदादांच्या अपघातासंदर्भात FIR दाखल करण्याची मांडलेली भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



शरद पवार–खरगे चर्चा निर्णायक? : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात झालेली चर्चा या निर्णयासाठी निर्णायक ठरल्याची माहिती काही नेत्यांनी खासगीत सांगितली. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सकाळी फोन केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

हेही वाचा -

  1. बारामतीत राजकीय वातावरण तापलं; तटकरे–पटेलांविरोधात रोष, “अजितदादांचे नावच पुरे!”
  2. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्जांचा विक्रमी पाऊस; सुनेत्रा पवारांसमोर 58 उमेदवारांचं आव्हान
  3. बारामती पोटनिवडणूक; बिनविरोधावर मतभेद, महायुती आणि काँग्रेसमध्ये नेमका संघर्ष कशासाठी?
Last Updated : April 9, 2026 at 5:03 PM IST