'अमेरिकेतील बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनची मध्यस्थी' : पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
बाल लैंगिक शोषण आणि तस्करीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेफ्री एपस्टीन याच्या एपस्टीन फाईलवरुन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहे.

Published : December 20, 2025 at 5:08 PM IST
|Updated : December 20, 2025 at 8:06 PM IST
सातारा : "अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिननं मध्यस्थी केली होती," असा दावा काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. "बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील एपस्टीनचे पंतप्रधान मोदींशी नक्की नाते काय? " असा सवाल देखील त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

'मोदींशी भेट घालून देण्यासाठी मेलद्वारे विनंती' : अमेरिकेतील बाल लैंगिक शोषण प्रकरणातील एपस्टीन फाईल्स सार्वजनिक झाल्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीनच्या ई-मेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण पुढं म्हणाले की, "अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी 'मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे,' अशी विनंती एपस्टीनला मेलद्वारे केली. त्यावर एपस्टीननं, 'तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो,' असं उत्तर दिलं. त्यानंतर काही दिवसांनी एपस्टीननं बॅनन यांना पुन्हा मेल करून 'मोदी भेटायला तयार असल्याचं कळवलं होतं," असा आरोपही त्यांनी सांगितलं.
सरकारनं जनतेला उत्तर द्यावं : एपस्टीन फाईल्सच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या बाबींवर बोट ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला सवाल केले आहेत. "जेफ्री एपस्टीन हा बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता. अशा व्यक्तीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नक्की नातं काय? एका सेक्स स्कँडलमधील आरोपी भारताच्या पंतप्रधानांची अपॉइंटमेंट कशी काय ठरवू शकतो? या प्रश्नांची उत्तरं सरकारनं जनतेला द्यावीत," अशी मागणी त्यांनी केली.
एपस्टीन फाईल्समध्ये पुरी आणि अंबानींचं नाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय या फाईल्समध्ये इतरही भारतीय दिग्गजांची नावं असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामध्ये "केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव एका ई-मेलमध्ये आढळलं आहे. तसेच एका माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव या कागदपत्रांमध्ये असून अमेरिकेत राहणाऱ्या एका बड्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही यात समावेश आहे," असा दावाही त्यांनी केला.

