लाल सलाम! कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर यांच्यावर पार पडले अंत्यसंस्कार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अखेरचा चिरा ढासळला
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर यांचं सोमवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं.

Published : February 24, 2026 at 10:01 AM IST
सातारा - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि सातारा नगरपालिकेच्या राजकारणात एकमेव विरोधी पक्षनेत्या राहिलेल्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. 'माकप'चे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केलं. कॉ. अंजलीताईंच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील अखेरचा चिरा ढासळला आहे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाही.
डावा विचार आणि तत्वांवर ठाम - कॉ. महाबळेश्वरकर दाम्पत्य अखेरपर्यंत डाव्या चळवळीत सक्रिय होतं. अंजलीताई या सातारा नगर परिषदेच्या राजकारणातील एकमेव विरोधी पक्षनेत्या होत्या. डावा विचार आणि तत्वांवर त्या अखेरपर्यंत ठाम राहिल्या. जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना , घरेलू कामगार संघटनेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, मरियम बूटवाला, अशोक ढवळे यांनी अंजलीताईंची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
प्रत्येक आंदोलनात त्या अग्रभागी - कॉ. अंजलीताईंच्या मनात ८९ व्या वर्षी देखील त्या आंदोलनाचा विचार करायच्या. देशातील सामाजिक, राजकीय परिस्थितीबद्दल त्यांच्या मनात चीड व असंतोष उफाळून यायचा. वय झाले म्हणून घरी बसणे त्यांना मान्य नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आंदोलनाला बसण्यासाठी त्या तयार असायच्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेसाठी प्रत्येकी १ लाख रुपयांची देणगी दिली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील कार्यक्रमांना देखील त्या नेहमीच मदत करायच्या. प्रत्येक आंदोलनात त्या अग्रभागी असायच्या.
कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर वास्तव्यास असलेलं साताऱ्यातील मंगळवार पेठेतील त्यांचं घर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जणू कार्यालयच होतं. त्यांचं घर म्हणजे डाव्या चळवळीचा पत्ता होता. कॉ. महाबळेश्वरकर दाम्पत्य माकपचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर हे किसान सभेत, तर कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर या जनवादी महिला संघटनेत कार्यरत होत्या. कॉ. गोदावरी परुळेकर आणि कॉ. अहिल्या रांगणेकर ही त्यांची प्रेरणास्थानं होती. कॉम्रेड अंजलीताईंच्या कार्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अखेरचा लाल सलाम केला.

