ETV Bharat / state

'कॉक्रोच जनता पार्टी'वर ट्रेडमार्कची झुंबड: नावासाठी सहा दिवसांत अनेक अर्ज

15 मे रोजी सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' या नावाची मोठी चर्चा सुरू झाली. अभिजित दिपके यांनी तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी मोहीम सुरू केली.

Cockroach Janata Party
'कॉक्रोच जनता पार्टी'वर ट्रेडमार्कची झुंबड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2026 at 5:59 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : 'कॉक्रोच जनता पार्टी' या नावाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, सर्वत्र या पक्षाच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या नावाची संकल्पना मांडणारे अभिजित दिपके हे अमेरिकेत असले तरी त्यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे काही स्वयंघोषित नेत्यांनी आपलं नाव या पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर विविध पोस्टरद्वारे त्याचं सादरीकरणही करण्यात येत आहे.

दरम्यान, इतर ठिकाणीही काही संधिसाधूंनी या नावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. कोणतंही काम सुरू करताना अधिकृत नोंदणी आवश्यक असते. त्यामुळे व्हायरल होत असलेलं हे नाव स्वतःच्या नावे नोंदवून घेण्यासाठी काही जणांनी अर्ज दाखल केल्याचं समोर आले आहे. राजकीय पक्ष तसेच व्यावसायिक वापराच्या दृष्टीनेही नोंदणीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

मागील 6 दिवसांत भारतातून 10 जणांनी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी राजकीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असलेला 45 क्रमांकाचा अर्ज दोघांनी सादर केल्याची माहिती ट्रेडमार्क अभ्यासक ॲड. स्वप्नील महल्ले यांनी दिली. तथापि, अभिजित दिपके किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकृतपणे अर्ज करून आवश्यक पुरावे सादर केल्यास हे नाव त्यांना मिळू शकतं, असंही ॲड. महल्ले यांनी स्पष्ट केले.

'कॉक्रोच जनता पार्टी'वर ट्रेडमार्कची झुंबड (ETV Bharat)

6 दिवसांत 10 जणांचे अर्ज : 15 मे रोजी सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' या नावाची मोठी चर्चा सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अभिजित दिपके यांनी अमेरिकेत शिक्षण घेत असताना भारतीय व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी मोहीम सुरू केली. सरन्यायाधीशांनी तरुणांबाबत केलेल्या विधानाचा आधार घेत त्यांनी सोशल मीडियावर ही मोहीम राबवली. या मोहिमेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या काही दिवसांत या पेजला कोणत्याही नव्या पक्षाला मिळाले नाहीत इतके फॉलोअर्स मिळाले.

या मोहिमेवर विविध स्तरातून टीका-टिप्पणी झाली. मात्र काही जणांनी यामध्ये भविष्यातील संधी पाहत कायदेशीर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. 15 मे रोजी मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशी, म्हणजे 19 मे रोजी कॉक्रोच जनता पार्टी नावासाठी पहिला ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्यात आला. मागील सहा दिवसांत तब्बल 10 जणांनी नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती मेहले यांनी दिली.

विविध प्रवर्गांत नोंदणी : कॉक्रोच जनता पार्टी या नावासाठी देशभरातून आतापर्यंत 10 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये गुजरातमधून 3, तेलंगणामधून 3, हरियाणामधून 2, मध्यप्रदेशमधून 1 आणि राजस्थानमधून 1 अर्ज दाखल करण्यात आला आहे.

राजकीय पक्षासाठी नोंदणी करण्यासाठी ट्रेडमार्कच्या 45 क्रमांकाच्या प्रवर्गात अर्ज करणं आवश्यक असतं. दाखल झालेल्या अर्जांपैकी दोघांनी या प्रवर्गात अर्ज केल्याची माहिती ॲड. स्वप्निल महल्ले यांनी दिली. तर काही जणांनी भविष्यातील व्यावसायिक संधी लक्षात घेऊन टी-शर्ट, प्रचार साहित्य निर्मिती आदी विविध प्रवर्गांत नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. भविष्यात कॉक्रोज जनता पार्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास अधिकृत व्यवसाय करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही नोंदणी करण्यात आल्याचेही ॲड. महल्ले यांनी स्पष्ट केलं.

अशी करता येते नोंदणी : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचं अधिकृत नोंदणीकरण करणं आवश्यक असतं. यामध्ये प्रामुख्यानं व्यवसायाचं नाव आणि लोगो यांचा समावेश होतो. या दोन्ही घटकांची अधिकृत नोंदणी केंद्र सरकारच्या 'ट्रेडमार्क' प्रक्रियेद्वारे केली जाते.

ट्रेडमार्कचं नाव, लोगो, ध्वनी, लेबल आणि रंगसंगती अशा विविध स्वरूपात वर्गीकरण केलं जातं. एकूण 45 विविध वर्गांमध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय समाविष्ट केले जातात. मोठे उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव आणि ब्रँड सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रवर्गांमध्ये एकाच वेळी नोंदणी करतात. तर छोटे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार विशिष्ट श्रेणींमध्ये नोंदणी करतात, अशी माहिती ट्रेडमार्क अभ्यासक ॲड. स्वप्निल महल्ले यांनी दिली.

अशी असते नोंदणी प्रक्रिया : ट्रेडमार्क नोंदणीसाठी केंद्र सरकारनं निश्चित प्रक्रिया ठरवली आहे. नवीन व्यवसाय असल्यास अर्जदाराला आधारकार्डसह व्यवसायाचे नाव, लोगो आणि संबंधित वर्ग (क्लास) नमूद करून अर्ज करावा लागतो.

जुना व्यवसाय असल्यास त्यासंबंधीचे पुरावे सादर करावे लागतात. यामध्ये खरेदी-विक्रीची कागदपत्रे, लेटरहेड, व्यवसाय नोंदणीची कागदपत्रे आदींचा समावेश होतो. ही संपूर्ण प्रक्रिया तपासणी आणि पडताळणीसह पूर्ण केली जाते. साधारणतः यासाठी सहा महिने ते अठरा महिने इतका कालावधी लागतो. सर्व तपासणीनंतर अंतिम नोंदणी निश्चित केली जाते, अशी माहिती आर मार्क या ट्रेडमार्क करणाऱ्या कंपनीचे संचालक तथा ट्रेड मार्क अभ्यासक स्वप्नील महल्ले यांनी दिली.