15 जानेवारीला आमची काळजी घ्या, पुढंची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ: मुख्यमंत्र्यांची भावनिक साद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांना भावनिक साद घातली. महायुती महापालिकेत बहुमतानं विजयी होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


Published : January 3, 2026 at 9:12 PM IST
|Updated : January 3, 2026 at 10:33 PM IST
कोल्हापूर : "देशातील मोठी शहरं 65 टक्के जीडीपी तयार करतात, मात्र 70 वर्षात देशातील मोठ्या शहरांसाठी पैसा दिला जात नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी, अमृत सिटी, स्वच्छ भारत शहर असे अनेक कार्यक्रम घेऊन लाखो कोटी रुपये शहरांसाठी दिलेत. वस्त्रनगरी इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महायुती सरकार प्राधान्य देणार आहे. यामुळे 15 जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान आहे. या दिवशी तुम्ही आमची काळजी घ्या, यानंतर पाच वर्ष इचलकरंजीची काळजी आम्ही घेऊ," असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांना भावनिक साद घातली. शहरातील छत्रपती शाहू पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर काढण्यात आलेल्या रोडशोनंतर मुख्यमंत्री बोलत होते.

इचलकरंजीतील रोड शोला जोरदार प्रतिसाद : "इचलकरंजीतील रोड शोला जो प्रतिसाद मिळाला आहे, त्यावरून माझ्या मनात कोणतीच शंका नाही. महायुती महापालिकेत बहुमतानं विजयी होणार आहे. इचलकरंजी नगरपालिका आणि पहिल्यांदाच होणाऱ्या महापालिकेच्या इतिहासात असा प्रचंड विजय पहिल्यांदाच होईल. महायुतीच्या काळात शहरासाठी 18 एमएलडी सांडपाणी प्रकल्प, 116 कोटीचा चौकोन एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प, नगरोत्थान योजनेतून 107 कोटी रुपये शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी, अशी विकास काम केली आहेत. इचलकरंजी शहरासाठी मलनिस्सारीकरणाचा प्रकल्प जो राज्यासाठी मॉडेल आहे, झिरो डिस्चार्ज प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे. यासाठी 489 कोटी रुपये देण्यात आले. यामुळं ही निवडणूक आमच्यासाठी विकासाची निवडणूक आहे. आम्ही जी मत मागतो ती केवळ विकासावर मागतो. जे केलं आहे आणि जे करणार आहोत, या आधारावर आम्ही तुमच्याकडं मत मागतो आहोत. रोडशोला जो प्रतिसाद दिला आहे, तसा दुप्पट आशीर्वाद राज्य सरकार तुम्हाला देईल. जीएसटीच्या परताव्याचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त जीएसटीचे पैसे आता इचरकंजीला मिळणार आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा आमदार राहुल आवडेंचं सतेज पाटलांवर पलटवार : कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात पहिल्यांदा होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पाणीप्रश्न चांगलाच तापलायं. इचलकरंजी भाजपा आमदार राहुल आवाडे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यात जोरदार टीका सुरू झालीय. राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे. मग काँग्रेस आमदार सतेज पाटील काय डी वाय पाटील कॉम्प्लेक्समधून निधी आणणार आहेत का? असा सवाल भाजपा आमदार राहुल आवडे यांनी केला. यावर उत्तर देताना आवाडे अजून लहान आहेत, यांना काय बोलायचं कळत नसेल. 'अभी तो बच्चा है.. त्यांच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. दरम्यान याला आमदार राहुल आवाडे यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं, "एक वर्षापूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात इचलकरंजीतील लोकांनी सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून दिलेला राहुल आवाडे आहे. यामुळे बच्चा आहे का, काय आहे..बच्चा कोण आणि इचलकरंजीचा शेर कोण हे इचलकरंजीची जनता महापालिका निकालातून दाखवून देईल," असं उत्तर राहुल आवाडे यांनी दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या रोडशोला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला.


हेही वाचा :
- 'महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची'; मुख्यमंत्र्यांचा चिमटा, म्हणाले, 'साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण...'
- आता मिशन महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
- राज्यात भाजपाच नंबर 1चा पक्ष; राज्यात 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

