अमरावतीत भाजपाला मिळणार बहुमत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
अमरावतीत भाजपा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आज अमरावतीत आयोजित करण्यात आला होता.


Published : January 4, 2026 at 10:38 PM IST
|Updated : January 4, 2026 at 11:03 PM IST
अमरावती : "आज अमरावतीत झालेल्या रोड शोला अतिशय जोरदार प्रतिसाद मिळाला. अमरावतीचं वातावरण पाहता अमरावती महापालिकेत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचं अमरावतीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
रोड शो नंतर साधला संवाद : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केला. पंचवटी चौक येथून सुरू झालेल्या रोड शोचा समारोप साई नगर येथे झाला. साई नगर येथे मुख्यमंत्र्यांनी छोटेखानी सभेला संबोधित केलं. "अमरावतीत भाजपाची सत्ता होती. या पाच वर्षात अमरावती शहरात अमृत दोन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अमृत योजनेतून दोन हजार कोटी रुपये अमरावतीला मिळाले. दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था अमरावतीत आम्ही आणली आहे. शहरात वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्यकरणाचं काम भाजपानं केलं. वडाळी तलावाचा विकास येत्या काळात केला जाणार आहे. एकूणच अमरावती शहराचा विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साधला जातोय," असं मुख्यमंत्री म्हणाले.
अमरावतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसीत करणार : "शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून संपूर्ण विदर्भात शैक्षणिक वातावरण निर्माण केलं. आता विदर्भातील युवकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उंच भरारी घेता यावी, यासाठी भाजपा अमरावतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसीत करणार," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा :

