ETV Bharat / state

कोणी कितीही शिव्या दिल्या तरी परिणाम होत नाही, आता ‘विष पिण्याची सवय झाली; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना टोला

मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी आपल्यावर परिणाम होत नाही, कारण ‘विष पिण्याची सवय’ झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 10:23 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरून ढवळून निघालं आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. सर्वच बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील प्रचारात व्यस्त आहेत.

अशातच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी (6 जानेवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, कोणी कितीही शिव्या दिल्या तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही कारण ‘विष पिण्याची सवय’ झाली आहे. महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत असून विरोधकांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही, कारण विकासाच्या कामांवर जनता भाजपाला मतदान करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस (ETV Bharat)

'विष पिण्याची सवय, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कोणी गांभीर्यानं घेत नाही' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना म्हटलं की, "कोणी कितीही शिव्या दिल्या, माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. कारण मला विष पिण्याची सवय झाली आहे. महाराष्ट्राची जनता माझ्या सोबत असल्यामुळे अशा वक्तव्यांचा काहीही फरक पडत नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षात कोणी गंभीरपणे घेत नाही. त्यांच्या जिल्ह्यात, तालुक्यातही त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. तुम्ही का गंभीरपणे घेता? मला शिव्या दिल्यामुळे दिवसभर चॅनलवर त्यांचं नाव चालतं, एवढ्यासाठी ते असं बोलतात. त्याला उत्तर कशाला द्यावे?"

'वार थोपवतो, विकासावर बोलतो' : आम्ही महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रात केलेल्या विकासकामांवर मत मागत आहोत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "आम्हाला इतर विषय मांडण्याची गरज नाही. कोणी आमच्यावर एखादा वार केला, तर तो थोपवतो. बाकी आमचा विकासाचा अजेंडा सुरू आहे आणि त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांनी विकासकामं केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना वेगवेगळे मुद्दे मांडावे लागतात.

मनसेचे संतोष धुरी भाजपात : भाजपात वेगवेगळ्या पक्षांतील नाराज लोक येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असे लोक मुख्य धारेत यायला इच्छुक असतात. भाजपा ही लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे, म्हणून संतोष धुरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. संतोष धुरी यांना वाटतं की, मनसेनं शिवसेनेसोबत युती केली, ज्यामुळे मनसेला नुकसान होऊ शकते, त्यामुळे ते भाजपामध्ये आले."

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्षांसह पदाधिकारी भाजपात : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेचे महाराष्ट्रात सुमारे 50 हजार पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत असतात. मंगळवारी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नागपूरमधील भाजपाच्या प्रभाग क्रमांक 36 मधील मुख्य कार्यालयात हा सोहळा पार पडला.

हेही वाचा