कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा करणार आंदोलन, 5 सप्टेंबरला दिल्लीत मोर्चाचं आयोजन
सरकारनं कॉक्रोच जनता पार्टीला दिलेली लेखी आश्वासनंही आता प्रलंबित आहेत. त्यामुळे आता 5 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं पार्टीकडून जाहीर करण्यात आलय.


Published : August 24, 2026 at 7:02 PM IST
छत्रपती संभाजीनगर - कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारवर टीका करत 5 सप्टेंबरला पुन्हा दिल्लीत एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलं. या मोर्चाचं नेतृत्व नीट परीक्षेत पीडित असलेले कुटुंबीय किंवा पोलीस अत्याचारात पीडित असलेले कुटुंबीय हे करणार आहेत. तर सरकारनं काही प्रश्नांची उत्तर देणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची काय स्थिती आहे, शिक्षणावर किती खर्च केला जातो. शाळांच्या देखभाल दुरुस्तीवर किती खर्च होतो अशा प्रश्नांची उत्तर अपेक्षित आल्याचं पत्राद्वारे सिजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं.
पुन्हा एकदा आंदोलन - कॉक्रोच जनता पार्टीतर्फे 5 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी आश्वासनं दिली होती. त्याच आश्वासनांमुळे देशभर सद्भावनेनं आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र सरकार आपल्या शब्दावर कायम आहे का? याबाबत कॉक्रोच जनता पार्टीतर्फे सोमवारी झालेल्या बैठकीत सरकारच्या भूमकेवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली. सरकार आमच्या मागण्यांमध्ये वेळ काढूपणा करत असल्याचं दिसून येत आहे. तांत्रिक बाबींच्या आड लपले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोरही स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला देशभरात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरची यादी सादर करण्यास वारंवार सांगितलं, जेणेकरून न्यायालय त्यांचा एकत्रित विचार करू शकेल आणि एकाचवेळी प्रकरणे निकाली काढता येतील. ही वचनबद्धता पूर्ण व्हावी, यासाठी न्यायालयानंही आग्रह धरला. तरीही सरकारने स्पष्ट आश्वासन देण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारनं सीजेपीला दिलेले लेखी आश्वासनंही आता प्रलंबित आहेत. त्यामुळे आता 5 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं पार्टीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दिल्ली येथे आंदोलन - कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणी समितीनं एकमतानं 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. त्याचं नेतृत्व नीट परीक्षेमुळे मृत झालेले पीडितांचे कुटुंबीय आणि आंदोलन काळात पोलीस अत्याचाराचे पीडित करणार आहेत. सरकारच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागत आहे. सरकारनं शब्द देऊनही त्याचं पालन होत नाही, आम्हाला विश्वासघात मान्य नाही, अशा शब्दात टीका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शाळांबाबत माहिती उघड करावी
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये राज्यातील शाळांच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. देश स्वतंत्र होऊन 80 वर्षे झाली असताना राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचं योग्य पाणी मिळत नाही, स्वच्छतागृहं चांगली नाहीत. बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. स्कूल ठीक करो अभियानात अनेक ठिकाणची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्रालयाने खालील माहिती उघड करण्याची मागणी केलीय.
1) राज्यातील किती सरकारी शाळांचे गेल्या पाच वर्षांत नूतनीकरण करण्यात आले आहे आणि सध्या किती शाळांना दुरुस्ती किंवा संपूर्ण नूतनीकरणाची आवश्यकता आहे.
2) सध्या मंजूर असलेल्या शिक्षकांच्या किती जागा भरलेल्या आहेत आणि किती जागा रिक्त आहेत.
3) गेल्या पाच वर्षांत सरकारी शाळांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी प्रत्यक्षात किती निधी खर्च करण्यात आला.
4) प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची वाजवी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्यात आणखी किती सरकारी शाळांची आवश्यकता आहे.
5) अध्यापनाव्यतिरिक्त सरकारी शाळांमधील शिक्षकांना कोणती शिक्षणेतर कामे आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
6) सध्या किती सरकारी शाळांमध्ये संगणक व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा, स्वच्छ आणि कार्यरत स्वच्छतागृहे तसेच मुलांसाठी योग्य क्रीडा सुविधा आणि क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. ही माहिती तातडीने सार्वजनिक पणाने जाहीर करावी अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजीत दिपके याने पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा...

