ETV Bharat / state

वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 6 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरला छोटा वीर

अपघातामुळे ज्युनिअर मुंबई श्री 2026 मध्ये उतरण्याचं स्वप्न अधुरं राहिलेल्या उमेश पांचाळ यांना आपल्या चिमुकल्याचा सार्थ अभिमान आहे.

Little Veer entered a bodybuilding competition at the age of 6
6 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरला छोटा वीर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 10:43 AM IST

|

Updated : February 26, 2026 at 3:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : सोशल मीडियावर सध्या 6 वर्षीय रचित पांचाळ या चिमुकल्याचा एक व्हिडीओ जबरदस्त चर्चेत आलाय. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या 'ज्युनिअर मुंबई श्री 2026' स्पर्धेमध्ये 55 किलो वजन गट आणि 23 वर्षांखालील वयोगटात रचितनं त्याच्या वडिलांच्या जागी भाग घेत वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. रचितसोबत स्टेजवर कसलेले बॉडी बिल्डर्सही आपलं पोझिंग देत होते. मात्र, कसलीही पर्वा न करता पूर्ण आत्मविश्वासानं रचितनं आपला परफॉर्मन्स दिलाय.

6 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरला छोटा वीर (Source- ETV Bharat)

छोट्या पठ्यानं जिंकली सर्वांची मनं - आपल्या आजूबाजूला वयानं मोठी आणि अंगाने भारदस्त अशी मंडळी बॉडी बिल्डिंगच्या पोझ देत असताना या पट्ट्यानं मात्र मैदान गाजवलं. पांचाळ कुटुंबासोबत जेव्हा ई टीव्ही भारतनं संवाद साधला, तेव्हा रचितबद्दल बोलताना त्याच्या आईबाबांचा कंठ दाटून आला होता. आपला मुलगा जगासमोर वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला आदर्श मानत स्पर्धेत उतरतोय ही भावना व्यक्त करताना रचितचे आईवडील फारच भावूक झाले होते.

काय आहे रचितची कहाणी? - वर्ष 2024 मध्ये रचितचे वडील उमेश पांचाळ हे या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभागी होणार होते. पण स्पर्धेच्या अवघ्या 2 दिवस आधी अंधेरीतील ऑफिसमधून वसईला एका कामानिमित्त जात असताना त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यांच्या पायाच्या 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यातून त्यांना सावरण्यासाठी अनेक महिन्यांचा कालवधी गेला. यामुळे त्यांचं 'ज्युनिअर मुंबई श्री' स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र, आपल्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या 6 वर्षांच्या मुलानं पुढाकार घेत रितसर प्रशिक्षण घेत, व्यायाम करून यंदा मालाड इथं झालेल्या स्पर्धेत भाग घेत आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.

आई वडिलांना रचितचा अभिमान - रचितनं या स्पर्धेत सहभागी होऊन फक्त आपल्या वडिलांचं स्वप्नच पूर्ण केलं नाही तर, त्यांना अभिमानही मिळवून दिलाय. सेंट जोसेफ हायस्कूलचा विद्यार्थी असलेला रचित काही महिन्यांपासून त्याच्या वडिलांसह जिममध्ये व्यायामाचं प्रशिक्षण घेत होता. तो नियमितपणे सायकलिंग आणि धावण्याच्या स्पर्धेतही भाग घेतो. रचितच्या वडिलांना या स्पर्धेसाठी तयार करणाऱ्या विशाल परब यांनीही रचितला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. एप्रिल 2025 मध्ये गिरगावातील एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रचितनं पहिल्यांदा मंचावर बॉडी बिल्डिंगमध्ये सहभागी होत उपस्थितांची दाद मिळवली होती.

नवोदित बॉडी बिल्डर्सना प्रोत्साहन - 'ज्युनिअर मुंबई श्री' ही मुंबईतील बॉडी बिल्डर्ससाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. बृहन्मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनद्वारा ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये 55, 60, 65, 70 आणि 70 किलोवरील वजनी गटांचा समावेश असतो. प्रत्येक गटातील विजेत्यांमध्ये एक फायनल राऊंड होतो आणि त्यातून एकाला 'ज्युनिअर मुंबई श्री' हा किताब देऊन विजेता घोषित केलं जातं. फिटनेसचं वेड असलेल्या तरुणाईमुळे या स्पर्धेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळतोय.

Last Updated : February 26, 2026 at 3:49 PM IST