नवजात बाळासह मातेला रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसण्याची वेळ; चित्रा वाघ संतप्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना धरलं धारेवर
डफरिन रुग्णालयात वाहन उपलब्ध असूनही नवजात बाळासह मातेला पायऱ्यांवर थांबावं लागलं. सदरील प्रकार पाहून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रशासनाला धारेवर धरलं.

Published : August 29, 2026 at 2:49 PM IST
अमरावती : डफरिन रुग्णालयात (Dufferin Hospital) प्रसूतीनंतर डिस्चार्ज मिळालेल्या महिलेला गावी जाण्यासाठी रुग्णालयाची गाडी उपलब्ध असतानाही, गाडीत डिझेल नसल्यानं आपल्या नवजात बाळासह आणि सासूसोबत रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून राहण्याची वेळ आली. हा प्रकार समोर येताच भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांना धारेवर धरलं.
रुग्णालय प्रशासनाकडं जाब : डफरिन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर शनिवारी चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बाळाला घेऊन बसलेल्या मातेचा प्रकार निदर्शनास आणून दिला. पत्रकारांनी संबंधित महिलेचे फोटो आणि व्हिडिओही चित्रा वाघ यांना दाखवले. हा प्रकार पाहून त्यांनी तत्काळ रुग्णालय प्रशासनाकडं जाब विचारला.
गाडीत डिझेल नाही : मूळची मध्य प्रदेशातील असलेली रिना उईके ही महिला कामानिमित्त नजीकच्या माहुली जहांगीर येथे वास्तव्यास आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी तिला डफरिन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसूतीनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. गावी जाण्यासाठी रुग्णालयाची गाडी उपलब्ध होती, मात्र गाडीत डिझेल नसल्यानं रिना उईके आपल्या नवजात बाळासह आणि सासूसोबत रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून असल्याचं समोर आलं.
खासगी वाहनानं घरी जावं लागलं : दरम्यान, यापूर्वी अवघ्या 15 ते 20 मिनिटांपूर्वीही काही रुग्णांना रुग्णालयातून खासगी वाहनानं घरी जावं लागल्याची माहिती पत्रकारांनी चित्रा वाघ यांना दिली. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओही त्यांना दाखवण्यात आले.
तुम्ही सरकारला बदनाम करत आहात : या प्रकारावर चित्रा वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांना चांगलेच सुनावलं. “आमच्यासमोर असा प्रकार होत असताना आमच्या माघारी काय होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. तुम्ही सरकारला बदनाम करत आहात. एक महिला बाळाला घेऊन अशी बसली आहे. सीएस साहेब, तुम्ही काय सांगता आम्हाला?” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित : डफरिन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतानाच, डिस्चार्ज झालेल्या मातेला गावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध असूनही केवळ डिझेलअभावी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर थांबावं लागल्यानं रुग्णालयातील व्यवस्थेचा आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला आहे.
हेही वाचा -
- 'माता-भगिनींचे आशीर्वाद, पुण्याईची कवचकुंडले माझ्या पाठीशी..', मंत्री हसन मुश्रीफ यांचं कागलमध्ये रक्षाबंधन
- सुखबीर सिंग बादल यांच्यावरील दुसरा वार स्वतःच्या हातावर झेलला; पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे ठरले ‘रिअल हिरो’
- 431 वर्षांची परंपरा : श्री रुक्मिणी मातेची कौंडण्यपूरहून विदर्भातील एकमेव मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना

