तिरुपतीच्या साजात विराजणार चिंचपोकळीचा चिंतामणी; आगमन सोहळ्यात भक्तांचा महासागर
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा 107व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून विशेष सजावट करण्यात येणार आहे.

Published : August 29, 2026 at 6:09 PM IST
मुंबई : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो’च्या जयघोषात लालबाग-परळ परिसरातील प्रसिद्ध ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणपतीचा आगमन सोहळा आज शनिवारी (29 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात पार पडला. चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो गणेशभक्त, मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा 107व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून विशेष सजावट करण्यात येणार आहे. तिरुपती तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर बालाजी मंदिराच्या धर्तीवर गणेशमूर्तीची सजावट करण्यात येणार आहे.
तसेच, हैदराबादच्या स्वर्णमंदिराच्या धर्तीवर मंडप परिसराची सजावट करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ-चिंचपोकळी परिसराला तिरुपतीच्या मंदिराची झळाळी पाहायला मिळणार आहे.
बालाजीच्या संकल्पनेवर चिंतामणीचा साज : चिंचपोकळीच्या चिंतामणीची गणेशमूर्ती दरवर्षी भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. यंदा श्री बालाजी देवस्थानच्या संकल्पनेनुसार गणेशमूर्तीला विशेष सजावटीचा साज चढवण्यात येणार आहे. गरूड, कीर्तिमुख, शंख, चक्र आणि कर्पूरयुक्त नामम् अर्थात टिळा यांसारख्या वैशिष्ट्यांचा मूर्तीच्या सभोवतालच्या सजावटीत समावेश करण्यात येणार आहे.
विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी मंदिराच्या संकल्पनेवर आधारित या सजावटीमुळे चिंतामणी गणपतीचे प्रासादिक सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. आकर्षक गणेशमूर्तीला या आभूषणांचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावटीचा साज लाभणार असल्यानं यंदाचा दर्शनाचा अनुभव भाविकांसाठी खास ठरणार आहे.
दक्षिण भारतीय मंदिरांच्या स्थापत्यशैलीची झलक : मंडळाच्या परिसरात केवळ तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही, तर हैदराबाद येथील श्री वेंकटेश्वर मंदिर (स्वर्णगिरी) आणि भुवनगिरी येथील मंदिरांच्या स्थापत्यशैलीचीही झलक पाहायला मिळणार आहे.
मंडप आणि परिसरातील सजावटीत दक्षिण भारतीय मंदिरांच्या वास्तुशैलीतील गोपुरम आणि दीपस्तंभ यांसारख्या रचना उभारण्यात येणार आहेत. याशिवाय पौराणिक कथांमध्ये आढळणाऱ्या आणि दक्षिण भारतीय मंदिरांच्या वास्तुरचनेत वापरल्या जाणाऱ्या याली किंवा व्याला या रक्षक प्राण्याच्या प्रतिकृतीही सजावटीचा भाग असतील.
सिंह, हत्ती आणि घोड्याचे मिश्रण असलेल्या या पौराणिक रक्षक प्राण्याच्या प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
आधुनिक तंत्रज्ञानातून साकारतेय कलात्मक सजावट : मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती देताना सांगितले की, उत्तमोत्तम कलाकार आणि कुशल कारागिरांच्या मदतीने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कलात्मक निर्मिती साकारण्यात येत आहे. अत्यंत कल्पक पद्धतीने यंदाची सजावट साकारली जात असून, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ही सजावट विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास डिचोलकर यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या ऐतिहासिक गिरणगाव परिसरात 1920 मध्ये स्थापन झालेले चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ शहराच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा भाग मानले जाते. गिरणगावातील कष्टकरी वर्गाच्या संस्कृतीचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून चिंचपोकळीचा चिंतामणी आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.
दरवर्षी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला मुंबईसह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. त्यामुळे लालबाग-परळ-चिंचपोकळीच्या ‘गिरणगाव’ पट्ट्यातील या गणपतीच्या आगमनाला विशेष महत्त्व आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला अदाणी उद्योग समूहाचे विशेष सहकार्य लाभले आहे. गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे शिल्लक असल्याने मंडळाच्या वतीने उत्सवाची तयारी वेगाने सुरू असून, सजावट, मंडप आणि अन्य व्यवस्थांची कामे अहोरात्र सुरू आहेत.

