अकोले तालुक्यात धक्कादायक वास्तव; तीन महिन्यात 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित मुलगी गरोदर
अकोले तालुक्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित मुलगी गरोदर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

Published : January 7, 2026 at 7:12 PM IST
|Updated : January 8, 2026 at 7:54 PM IST
अकोले (अहिल्यानगर) : अकोले तालुक्यात बालविवाहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही अकोले तालुक्यात आढळून आलेल्या बालमातांच्या या आकडेवारीमुळं संताप व्यक्त केला जात आहे.
अल्पवयात पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनेत वाढ : अकोले तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असून, अल्पवयात पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. सरासरी दोन दिवसात एक मुलगी पळून जाऊन लग्न करत असल्याचं चित्र सध्या तालुक्यात आहे. या घटनांमुळं एक वेगळाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या मदतीनं गेल्या पाच वर्षात 500 च्या वर बालविवाह अकोले तालुक्यात थांबवण्यात प्रशासन आणि आमची स्थानिक सामाजिक संस्था समर्थ यांना यश आल्याची माहिती, अकोले तालुका बाल संरक्षण समिती सदस्य श्रीनिवास रेणुकदास यांनी दिली.
अकोले तालुक्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली : अकोले तालुक्यातील महिला व बालविकास विभागाच्या अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दर महिन्याला होणाऱ्या गरोदर आणि स्तनदा मातांच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि 1 अविवाहित मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही मुलींची प्रसूतीही झाली आहे. तसंच अनेक अल्पवयीन मातांची शासकीय दप्तरी नोंद नसल्याची माहिती, प्रकल्प अधिकारी अर्चना एखंडे यांनी दिली.

तालुक्यात एक अविवाहित मुलगी गरोदर : अकोले तालुक्यात महिला व बालविकास विभागाचे अकोले आणि राजूर असे दोन प्रकल्प आहेत. अकोले प्रकल्पांतर्गत 326 अंगणवाडी सेविका आणि 11 पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. दरमहा अंगणवाडी सेविका गरोदर आणि स्तनदा मातांचा सर्वे करतात. या सर्वेच्या माध्यमातून त्यांना पोषण आहार दिला जातो. याच सर्वेक्षणातून अकोले तालुक्यात तीन महिन्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि 1 अविवाहित मुलगी गरोदर आढळून आल्याची माहिती, महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अर्चना एखंडे यांनी दिली.
18 वर्षांखालील गरोदर महिलांची नोंद : अकोले प्रकल्पात 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात 35, सप्टेंबरमध्ये 35, ऑक्टोबरमध्ये 32 आणि नोव्हेंबरमध्ये 32 अशा 18 वर्षांखालील गरोदर महिलांची नोंद आढळून आली आहे. तर राजूर प्रकल्पात 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात 18, सप्टेंबरमध्ये 20, ऑक्टोबरमध्ये 20 आणि नोव्हेंबरमध्ये 20 अशा नोंदी आढळून आल्याची माहिती, अर्चना एखंडे यांनी दिली. केंद्र सरकारची मातृत्व वंदना योजना देखील राबवण्यात येत असून, या योजनेअंतर्गत प्रसूती झालेल्या महिलांना 5 हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं. यामध्ये प्रथम 3 हजार आणि नंतर 2 हजार रुपये दिले जातात. यासाठी 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची अट आहे. पूर्वी ही योजना आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत होती. मात्र, एप्रिल 2025 नंतर महिला व बालविकास विभाग ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी फॉर्म भरण्यास आलेल्या महिलांमध्येही अल्पवयीन गरोदर महिला असल्याची माहिती पुढे आली आहे. महिला व बालविकास विभागाच्यावतीनं तालुक्यात गरोदर महिलांचे दरमहा शिबीर घेतले जात असून बालरोगतज्ज्ञ व स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर या सर्व महिलांची तपासणी करतात, असं अर्चना एखंडे यांनी सांगितलं.

बालविवाह का केला जातो? : महिला व बालविकास विभागाच्या दरमहा होणाऱ्या गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या सर्वेक्षणात अनेक महिला जाणीवपूर्वक नोंद करून घेत नाहीत. सामाजिक दबाव, बदनामीची भीती, कौटुंबिक मौन आणि कायद्याची भीती यामुळं अनेक प्रकरणे कागदोपत्री येत नाहीत. असुरक्षिततेच्या भीतीतून विवाह, मुलगी वयात आली की पळून जाईल या भीतीपोटी अनेक पालक अल्पवयातच मुलींचं लग्न लावून देत असल्याचं पुढे आलं आहे. यातूनच अल्पवयीन मातांची संख्या वाढत आहे. लहान वयात झालेल्या विवाहामुळं महिलांचं आरोग्य खालावतं आणि अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. बालविवाह हे अनेक समस्यांचं मूळ असून त्याचं मुळासकट उच्चाटन करण्याची गरज असल्याचं, महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य कौन्सिल सदस्य संगिता साळवे यांनी सांगितलं.

रुपाली चाकणकर यांना दिलं निवेदन : अकोले तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 अल्पवयीन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगी गरोदर आढळून आली आहे. तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं हे रोखण्यासाठी अकोले तहसीलदार, महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आलं आहे. तर याप्रकरणी चाकणकर यांनी कारवाईचे आदेश दिल्याची माहिती, इंदिरा काँग्रेस कमिटीच्या राज्य उपाध्यक्ष गिरिजा पिचड यांनी दिली.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2022 मध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या 4 घटना घडल्या. सन 2023 मध्ये 14, सन 2024 मध्ये 16, तर सन 2025 मध्ये 9 महिन्यांत 10 घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुली मिसिंग होण्याच्या घटनाही धक्कादायक असून, सन 2022 मध्ये 75, सन 2023 मध्ये 102, सन 2024 मध्ये 84, तर सन 2025 मध्ये 9 महिन्यात 84 नोंदी झाल्याची माहिती, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिली.

कायद्याचा धाक व जनजागृती करणं गरजेचं : अकोले तालुक्यात बालविवाहाचं वाढतं प्रमाण व अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे प्रकार समोर येत असले तरी, कायद्याचा धाक व जनजागृती करणं गरजेचं आहे. महिला व बालविकास विभागाच्यावतीनं ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असून गावपातळीवरील बाल संरक्षण समित्या सक्रिय करण्याची गरज आहे. अलीकडंच अकोले येथे बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा घेण्यात आली असून ग्रामपातळीवरील शासकीय घटकांना सतर्क करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या अकोले प्रकल्प अधिकारी अर्चना एखंडे या तालुक्यातील वाड्या-वस्ती शाळा, ग्रामसेवक तसेच विविध क्षेत्रातील आणि संस्थांमध्ये भेटी देत असून, सर्वांना बालविवाह रोखण्याची शपथ देत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्यावतीनं विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बालविवाह रोखण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा अकोले प्रशासनानं दिला आहे.
हेही वाचा -

