विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून पदाचा गैरवापर करत उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांची चौकशी सुरू
नार्वेकरांमुळे अर्ज भरण्यास न मिळालेल्या या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे याची लेखी तक्रार केलीय. या तक्रारीची प्रत ईटीव्ही भारतकडे असून, आयोगाकडून महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागवण्यात आलाय.

Published : January 2, 2026 at 3:54 PM IST
|Updated : January 2, 2026 at 5:02 PM IST
मुंबई : महापालिकांच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार झालीय. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाकरिता प्रचाराचा धडाका सुरू होण्यापूर्वी राज्यातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप होतायत. यात विधानसभा अध्यक्ष हे महत्त्वपूर्ण संविधानिक पद भूषवणारे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आलीय.
राहुल नार्वेकरांवरील आरोपांची चौकशी सुरू - अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा तसेच आपल्या पदाचा गैरवापर करत पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप राहुल नार्वेकरांवर करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असतानाही राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावत फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी फॉर्म भरण्यापासून रोखल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नार्वेकरांमुळे अर्ज भरण्यास न मिळालेल्या या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे याची लेखी तक्रार केलीय. या तक्रारीची प्रत ई टीव्ही भारतकडे असून, यापक्ररणी आयोगाकडून महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागवण्यात आलाय. त्यानुसार या प्रकरणाची सध्या चौकशी सुरूय. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, अर्ज दाखल करतानाचा उमेदवारांचा व्हिडीओ, उमेदवारांसोबत कोण कोण उपस्थित होते?, राहुल नार्वेकर तिथं कशासाठी आले होते?, नार्वेकर यांनी खरोखरच उमेदवारांना धमकावलं होतं का?, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली?, याची माहिती सादर करत त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.
30 डिसेंबर रोजी नेमकं काय घडलं? - आगामी महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या तीन प्रभागांतून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केलेत. ते अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हेदेखील कुटुंबीय म्हणून तिथं उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारासही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी तिथं अन्य उमेदवारही आपला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते. मात्र अचानक पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं आणि धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिथं उपस्थित राहुल नार्वेकरांकडूनच पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप या उमेदवारांसह माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. महत्त्वाच्या सांविधानिक पदावर असलेल्या नार्वेकर यांचं हे वागणं पूर्णपणे असांविधानिक असल्याचा आरोप राठोड यांच्याकडून करण्यात आला. यासंदर्भात त्यांनीही महापालिका आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केलीय. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत, याशिवाय ते वकील असून, ते कायद्याचे अभ्यासकही आहेत. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे निष्पक्ष राहायला हवं होतं, असंही ते पुढे म्हणाले.
संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शुक्रवारी तोफ डागलीय. संजय राऊत म्हणाले की, सध्या अचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाने या सर्व आरओंचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजेत. त्यांना कोणत्या मंत्र्यांनी फोन केले? कोणते उमेदवारी अर्ज बाद केले? उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरओंच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. 30 डिसेंबर रोजी राहुल नार्वेकरांचं वर्तन तर अत्यंत गंभीर आहे. त्यांचा प्रवास शिवसेनेतूनच सुरू झालाय, 30 डिसेंबरचं त्या ठिकाणचं दुपारी 4 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज काढा. पण ते मिळणं कठीण आहे, कारण ते सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेलेत. विधानसभा अध्यक्षांचं सीसीटीव्ही फुटेज गायब होतं?, मुंबई महापालिकेचे आयुक्त जे जिल्हा प्रमुख निवडणूक अधिकारीही आहेत. तेही या कट-करस्थानामध्ये सामील झाले आहेत का?, निवडणूक आयोगानं या प्रकरणात चौकशी सुरू केलीय. विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमक्या दिल्याच्या या प्रकरणात चौकशी सुरू झाल्यावर लगेच सीसीटीव्ही फुटेज गायब होतं?, असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेत.
राहुल नार्वेकरांची भूमिका - यावर राहुल नार्वेकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिथं जेवढे उमेदवार उपस्थित होते, त्यांना सर्वांना आत घेण्यात आलं. मात्र त्यानंतरही तिथं लोक येत होते, त्यामुळे जे वेळेत आले नाहीत, त्यांना अर्ज भरता आले नाहीत. पोलिसांनी वेळ संपल्यावर गेट बंद केला, यात 212 या प्रभागातील भाजपाच्याही उमेदवाराला अर्ज भरता आला नाही. आम्ही पदाचा वापर केला असता तर हे झालं नसतं, पण ज्यांना यावर राजकारण करायचंय त्यांना करू द्या. त्यांना जो रडीचा डाव खेळायचा तो खेळू द्या, असा आरोपही नार्वेकरांनी केलाय.
हेही वाचाः
'युती, आघाडीशी पुणेकरांना...'; थेट विधान करत आबा बागुल यांनी विजयाचा व्यक्त केला विश्वास
समृद्धी महामार्गावर बसने घेतला पेट, चालकाचा मृत्यू; एक प्रवासी गंभीर जखमी

