होळीनिमित्त सुरू झाले गाठीचे कारखाने, 96 वर्षांपासून 'बसैय्ये बंधू' करतायत व्यवसाय
छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागात 'बसैय्ये बंधूं'चा साखरेच्या गाठी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे. गेल्या 96 वर्षांपासून त्यांचं कुटुंब या व्यवसायात आहे.

Published : February 27, 2026 at 9:06 PM IST
छत्रपती संभाजीनगर : होळीच्या सणानिमित्त पूजनात साखरेच्या गाठी ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. काळाच्या ओघात आरोग्यदायी गाठी तयार करणाऱ्यांची संख्या कमी झाली असली, तरी काही कुटुंबं हा पारंपरिक व्यवसाय निष्ठेनं पुढे नेत आहेत. त्यामध्ये 'बसैय्ये बंधूं'चा समावेश असून त्यांचं कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहे. सध्या बाजारात लोखंडी साच्यातील गाठी उपलब्ध आहेत. त्या स्वस्त असल्या तरी आरोग्यास अपायकारक असल्यानं त्यांना कमी मागणी असते. याउलट सागवान लाकडाच्या साच्यात तयार केलेल्या गाठी आरोग्यदायी मानल्या जातात आणि त्यांना चांगली मागणी आहे. मात्र, त्यांचा पुरवठा मर्यादित आहे.
साखरेच्या गाठी तयार करण्याची प्रक्रिया : छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागात 'बसैय्ये बंधूं'चा साखरेच्या गाठी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे. इथं साखरेच्या पाकात लिंबू व दूध मिसळून पाक शुद्ध केला जातो. त्यानंतर हा पाक सागवान लाकडाच्या साच्यात ओतून गाठी तयार केल्या जातात. लाकडी साच्यात तयार झालेल्या गाठी आरोग्यास हितकारक असल्याचा दावा व्यावसायिक जगन्नाथ बसैय्ये यांनी केला आहे.
कोणत्या गाठींना सर्वात जास्त मागणी? : बाजारात विविध प्रकारच्या गाठी उपलब्ध आहेत. देवांना अर्पण करण्यासाठी विशेष गाठी तयार केल्या जातात. विशेषतः नोटा आणि आरसे लावलेल्या गाठींना अधिक मागणी असल्याचं जगन्नाथ बसैय्ये यांनी सांगितलं. सध्या शहरात केवळ 5 ते 6 कुटुंबं हा पारंपरिक व्यवसाय सांभाळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहरात विविध प्रकारच्या साखर गाठी तयार केल्या जात आहेत. पूर्वी एक किलो वजनाच्या मोठ्या गाठींची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, सध्या कमी वजनाच्या पण संख्येनं जास्त गाठींना अधिक मागणी आहे. त्यामुळे छोट्या आकारांच्या गाठींचं उत्पादन वाढलं आहे, अशी माहिती जगन्नाथ बसैय्ये यांनी दिली.
एका किलोमध्ये एक, तीन, पाच, सात, नऊ किंवा अकरा गोळे बसतील अशा गाठी तयार केल्या जातात. कड्याच्या आकाराच्या तसेच, सूर्याच्या चित्राच्या गाठी विशेष आकर्षण ठरतात. गुढी पाडव्याच्या काळात सूर्याच्या आकाराच्या गाठींना जास्त मागणी असते. मागणीच्या तुलनेत शहरातील उत्पादन कमी पडत असल्यानं आसपासच्या गावांमधूनही गाठी मागविल्या जातात. दरवाढ आणि मजुरी वाढल्यामुळे गाठींच्या किमतीत सुमारे 15 टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
जावयाला गाठी देण्याची परंपरा : पूर्वी पैशांची माळ असलेल्या साखर गाठींना मोठी मागणी होती. जावयासाठी नोटांची माळ असलेली गाठी खास तयार केली जात होती. मात्र, भारतीय चलनाचा अवमान होत असल्यानं शासनानं यावर बंदी घातली. तरीही ग्रामदेवता किंवा इतर देवतांना भेट अर्पण करण्यासाठी कमी प्रमाणात नोटा लावलेल्या गाठींची मागणी केली जाते. जावयासाठी आरशांनी सजविलेली गाठी भेट म्हणून दिली जाते. काही ठिकाणी मंदिरात देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी आरशांच्या माळाही विकत घेतल्या जातात.
जगन्नाथ बसैय्ये यांनी सांगितलं की, त्यांचं कुटुंब मागील 96 वर्षांपासून गाठी तयार करण्याच्या व्यवसायात असून सध्या पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. लग्न ठरल्यानंतरही गाठी देण्याची प्रथा आहे. नवीन सोयरीक जुळल्यावर मुलाकडील मंडळी मुलीच्या घरी जाऊन तुळशीच्या आकाराची गाठी देतात, जे लक्ष्मीचं प्रतीक मानली जातं. तसेच मुलीच्या घरून नवऱ्या मुलाच्या घरी नारळाच्या आकाराची गाठी देऊन त्याचे कुटुंबात स्वागत केलं जातं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गाठी बाजारात उपलब्ध असल्याची माहितीही जगन्नाथ बसैय्ये यांनी दिली.
हेही वाचा
- निसर्ग भ्रमंतीतून समाजसेवेचा संकल्प; दोन डॉक्टरांची मेळघाटात आरोग्य सेवेची अनोखी वाटचाल
- मेळघाटातील रायपूर गावाची दुहेरी कोंडी; व्याघ्र प्रकल्पामुळे वीज येईना, ढगाळ वातावरणात सौर उर्जा ठरतेय कुचकामी
- विदर्भातील पांढऱ्या सोन्याला तपकिरी अन् हिरव्या रंगाची झळाळी; नागपूरच्या कापूस अनुसंधान केंद्रात यशस्वी प्रयोग

