बाळासाहेबांनी भरवलं नसतं, तर तुमचा राजकीय मृत्यू झाला असता, - उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल!
छत्रपती संभाजीनगरात उबाठा पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अमित शाह आणि भाजपाचा समाचार घेतला.

Published : January 11, 2026 at 7:57 AM IST
|Updated : January 11, 2026 at 8:41 AM IST
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदारांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात प्रहार केला. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरवलं नसतं, तर तुमचा कुपोषणानंच राजकीय मृत्यू झाला असता," अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "भाजपानं आपलं वेगळेपण गमावलं असून, पूर्वी ‘राष्ट्रप्रथम’ म्हणणाऱ्या पक्षाची ओळख आता ‘भ्रष्टाचार प्रथम, बलात्कारी प्रथम, खुनी प्रथम’ अशी झाली आहे," असा आरोप त्यांनी केला.
सत्ताधारी निष्क्रिय- उद्धव ठाकरे : निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हाल सुरू असून, बाहेरून आलेल्या घाण लोकांना अंघोळ घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत, असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. बाळासाहेबांच्या आवडत्या शहरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकता न आल्याचं शल्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. आता महानगरपालिका जिंकून देण्याची जबाबदारी तुमची आहे, असं आवाहन करत, तुम्ही तुमचा शब्द पाळा, आम्हीही आमचा शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही, असं भावनिक आवाहनदेखील उद्धव यांनी यावेळी केलं.
'अजित पवार पुन्हा पक्ष बदलणार का?' : शहरात लावलेल्या जाहिरातींवर टीका करत 'ट्रिपल इंजिन सरकार' म्हणताना लाज वाटायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. मेवा भाऊंनी बॅनरवर 'विकासाची गती' असं लिहिलं असलं तरी प्रत्यक्षात ती 'विनाशाची गती' असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 'आता वेळ बदलाची' असं बॅनर लावलं असून, अजित पवार पुन्हा सरकार बदलणार का? असा मिश्किल सवालही त्यांनी केला.
'राज्य हातात असताना नशामुक्ती झाली नाही, महापालिका मिळाल्यावर कशी होणार?' : भाजपा शहर नशामुक्त करू असं म्हणते, पण सरकार तुमचं असताना नशामुक्ती झाली नाही, तर महानगरपालिका मिळाल्यावर ती कशी होणार? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला. शहरात दारू सहज मिळते पण पाणी मिळत नाही, खोटी आश्वासनं देणारी लोकं सत्तेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
'बाळासाहेबांनी भरवलं नसतं तर तुमचा राजकीय मृत्यू झाला असता' : रावसाहेब दानवे यांच्या 'आमच्या ताटात तुम्ही बसले होते,' या विधानाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही भरवलं नसतं तर तुमचा राजकीय मृत्यूच झाला असता. शहराचं नाव बदलण्याचा निर्णय मी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं," असं त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही छत्रपती नाव जोडलं हे चांगलं केलं, मात्र आम्ही केल्यामुळेच ते शक्य झालं, नाहीतर तुमच्यात ती हिंमत नसती, असंही त्यांनी म्हटले. अहमदाबादचे नाव कर्णावती करून दाखवा, अमित शाह यांचा तो मतदारसंघ आहे, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला दिलं.
'इथं माणसं राहतात की नाही?' : प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी शहराच्या पाणी प्रश्नावर भाजपावर गंभीर आरोप केले. पाणी त्यांनी दिलं नाही. मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली कामे आजही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. इथं माणसं राहतात की नाहीत आणि राहत असतील तर त्यांच्यात चीड आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मी मुख्यमंत्री राहिलो असतो तर आतापर्यंत शहराला पाणी मिळाले असते, असे ते म्हणाले. महानगरपालिकेकडे पैसे नसल्यामुळे पाणी योजनेचा खर्च मी राज्य सरकारकडे घेतला होता. दोन वेळा प्रत्यक्ष येऊन पाहणीही केली होती, मात्र त्यानंतर काम पूर्ण करण्यात आलं नाही. त्यामुळे शहराच्या पाणी समस्येला भाजपाच जबाबदार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केलं.
'निवडणूक जिंकल्यावर राज ठाकरेंना सोबत घेऊन येणार' : निवडणूक जिंकल्यानंतर राज ठाकरे यांना सोबत घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाकडे उमेदवारच नाहीत, याला उचल त्याला उचल असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
'तो स्वीकृत नगरसेवक कसा झाला?' : बदलापूर अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला, मात्र, त्याचा सहआरोपी तुषार आपटे हा संघाचा माणूस असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याचं काय झालं? आणि तो स्वीकृत नगरसेवक कसा झाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तुमचे नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून एका विकृत माणसाला स्वीकृत नगरसेवक केलं का? अशी थेट टीका त्यांनी भाजपावर केली.
'फोन पेच्या माध्यमातून दोन हजार वाटले' : फोन-पेच्या माध्यमातून दोन-दोन हजार रुपये वाटले जात असल्याचा आरोप करत, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहत असल्याचं सांगत, विरोधात कोणी उरू नये म्हणून पैशांचा वापर करून बिनविरोध निवडणूक घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पैशांचा माज करू नका, अन्यथा ममता बॅनर्जींसारखे आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
'अजित पवारांची माफी मागा' : प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि भाजपावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. अजित पवार मोठ्यानं सांगत आहेत की, ज्यांनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, तेच आज सत्तेत माझ्यासोबत बसले आहेत. मग अशा व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसता कसे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. "देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी भरून पुरावे देणार असल्याचं सांगितलं होतं, मग आता त्या पुराव्यांचे काय झालं? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. जर ते कागद खरे असतील तर अजित पवार यांना सोबत घेऊ नका आणि जर ते खोटे असतील तर अजित पवार यांची जाहीर माफी मागा," अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
'... हे तर अमित शाह यांचं अपयश' : देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत, किती विकासकामं केली ते सांगा, की फक्त हिंदू-मुस्लीम भांडणं लावली ते सांगा, असंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ दाखवा, त्यात ते काय बोलतात ते लोकांनी पाहावे, असंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसले असल्याचं सांगितलं जातं, पण तुमचंच सरकार सत्तेत असताना हे होत असेल तर ते अमित शाह यांचं अपयश आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा तीव्र समाचार घेतला.
हेही वाचा

