शिवसेना जिल्हाध्यक्षांची संजय शिरसाटांच्या घरावर धडक; पक्षशिस्त नसल्याचं सांगत विकास जैन यांची निवडणुकीकडे पाठ
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेत अंतर्गत नाराजीनाट्य उफाळून आलं आहे. त्यामुळे पक्षशिस्तीसाठी एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावं, अशी माजी महापौर विकास जैन यांनी मागणी केली.

Published : December 30, 2025 at 12:08 PM IST
|Updated : December 30, 2025 at 12:42 PM IST
छत्रपती संभाजीनगर - महायुतीमध्ये जागावाटपात विलंब होत असताना दुसरीकडे शिवसेनेत सोमवारी मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी समर्थकांसह शिवाजीनगर येथे मोठी गर्दी करत युती तोडण्याची मागणी केली. या प्रकारानंतर नाराज झालेल्या माजी महापौर विकास जैन यांनी महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं.
जंजाळ झाले संतप्त- शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. युतीमध्ये कमी जागा मिळाल्या तर हा सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. त्यामुळे मी स्वतः निवडणूक लढणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. हा निर्णय जाहीर होताच जंजाळ यांच्या घराजवळ समर्थकांनी गर्दी करत युती तोडण्याची मागणी केली. ही मागणी घेऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि त्यांचे समर्थक हे रात्री पालकमंत्री तथा पक्षाचे नेते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी धडकले. अचानक झालेली गर्दी पाहता पोलिसांनी त्यांना मोठं संरक्षण दिलं. संजय शिरसाट यांच्या घराला छावणीचं रुप प्राप्त झालं. शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या प्रभागात भाजपाला सर्व वॉर्डांत जागा देण्यात आल्यानं समर्थक नाराज असल्याचं शिवसेना जिल्हाध्यक्ष जंजाळ यांनी माध्यमांना सांगितलं. यावेळी युती तोडा, अशा घोषणा समर्थकांनी दिल्यानं नाराजीनाट्य चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळालं.
शिरसाट यांनी भाजपावर व्यक्त केला रोष- शिवसैनिकांचा हा उद्रेक आहे. भाजपासोबतच्या बैठकीतून काही निष्पन्न झालं नाही, म्हणून हे असं झालं आहे, असं सांगून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपावर रोष व्यक्त केला. शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिक नाराज आहेत. आमचे सहकारी पक्ष (भाजपा) याला गांभीर्यानं घेत नाही. युतीबाबत आम्ही 4 वाजेपर्यंत चर्चा करत होतो. मात्र, भाजपाकडून कागदावर आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या. अजून नव्यानं प्रस्ताव आला नाही. त्यांच्या मनात काय चाललेलं कळत नाही. युती करायची नसेल तर करू करू. पण मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर त्यांच्या आदेशाचं पालन व्हायला हवं. मोठं कोण? हे स्थानिक नेत्यांनी सांगावं. प्रस्तावात चुका दूर झाल्या तर मी आणि मंत्री अतुल सावे प्रेस घेऊ. आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत. युती व्हावी अजूनही आमची इच्छा आहे. ते उशीर का करत आहेत, हे कळत नाही, अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
अद्याप जागावाटप ठरलं नाही- "तूर्त तरी युती झाली असं म्हणता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. आम्ही अजूनही भाजपाच्या प्रस्तावाची वाट पाहतोय. जर आले नाही तर शिंदेसाहेब जो आदेश देतील ते मान्य करू. सकारात्मक प्रस्ताव आला नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे साहेबांना कळवू. योग्य निर्णय घेऊ. वेळेची मर्यादा आहे, त्यांनाही विनंती आहे," असं पालकमंत्री शिरसाट यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
माजी महापौर विकास जैन लढवणार नाहीत निवडणूक- जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या कृतीवर माजी महापौर विकास जैन नाराज झाले आहेत. पक्षात शिस्त राहिलेली नाही, असं सांगत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून शिस्त लावावी, अशी त्यांनी मागणी केली. विकास जैन म्हणाले, मी गेली 30 वर्षे राजकारणात सक्रिय आहे. मात्र, सध्या पक्षात जे सुरू आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. संघटनात्मक शिस्त राहिलेली दिसत नाही. आपली निष्ठा कायम राहील. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर किंवा कुटुंबीयांना थेट लक्ष्य करणं योग्य नाही. अशा प्रकारांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा त्यांनी आरोप केला. माजी महापौर जैन यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-

