'विकास योजनांची यादी अजित पवारांना पाठवणार'; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
पुण्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

Published : January 6, 2026 at 10:11 PM IST
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. याबाबत भाजपा नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "2014 मध्ये असलेलं पुणे आणि 2017 नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकासकामं सर्वांना माहिती आहेत. अनेकदा अजित पवार यांनी केंद्राने केलेला विकास तसंच राज्यानं केलेला विकास मान्य केला आहे."
महायुतीच्या नेत्यांवर टीका करू नये : "अजित पवार यांना मी 2017 नंतर पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या विकासकामांची यादी देऊ शकतो. अजित पवार यांनी भाजपाच्या नावानं टीका-टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करू नये, मी अजित पवार यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. मी एक तिन्ही पक्षाच्या समन्वयक समितीचा सदस्य आहे. आमच्या बैठकीत स्पष्ट निर्णय झाला आहे की, महायुतीच्या कोणत्याही नेत्यावर मतभेद होतील अशी टीका करू नये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय मान्य केला आहे. यापुढे अजित पवार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची भाजपावर टीका होणार नाही अशी अपेक्षा," मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी अशी टीका करू नये : "पुणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास झालाय, हे अजित पवार खासगीतही मान्य करतील. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या काळात झालेल्या विकास योजनांची सविस्तर यादी आपण अजित पवार यांना पाठवणार आहोत. भाजपाचे नाव घेऊन टीका करण्याचं कर्तृत्व अजित पवार यांनी दाखवू नये. तसंच विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत जनतेनं भाजपाला भरभरून मतदान केलं असून, आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपाला 51 टक्क्यांहून अधिक मतं मिळतील," असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. “विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास हे समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे," असं बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -

