'इक दिल के टुकडे हजार हुए, कोई...' अशी महाविकास आघाडीची अवस्था, राज्यसभा निवडणुकांवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.

Published : February 27, 2026 at 5:45 PM IST
पुणे : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते आज शुक्रवारी (27 फेब्रुवारी) पुण्यातील सिंचन भवन इथं 'मराठा इंटरप्रिन्यूअर्स असोसिएशन'च्या वतीनं आयोजित बिझनेस एक्स्पोचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी 'मराठी भाषा गौरव दिन'च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसंच, राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं.
'महाविकास आघाडीत सगळेच नाराज' : महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना सांगितलं की, 'राज्यसभेच्या एका जागेबाबत महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. जर त्यांचं एकमत झालं तर महाविकास आघाडीचा एक खासदार होईल. जर एकमत झालं नाही, तर परमेश्वरच जाणो. महाविकास आघाडीत सध्या सर्वच नाराज आहेत. 'इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा', अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केलं.
'एक्स्पो महाराष्ट्रासाठी सकारात्मक' : बिझनेस एक्सपोबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, 'मराठा समाजानं विविध व्यवसायिकांना एकत्र आणून हा एक्स्पो आयोजित केला आहे. कृषी क्षेत्रातील विकासाचे परिणाम या कार्यक्रमात प्रेझेंटेशनद्वारे दाखवले जात आहेत. महाराष्ट्रासाठी हा एक्स्पो खूपच सकारात्मक ठरतो आहे'.
'अहवाल येईपर्यंत वाट पाहू' : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. काल सीआयडी कार्यालयात त्यांनी आपला जबाब नोंदविला. याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, 'पूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं की, अहवाल लवकरच येईल. अहवाल आल्यानंतर खरी वस्तुस्थिती देश आणि जगासमोर येईल. ज्या अधिकृत यंत्रणेचे अहवाल आहेत, त्याची वाट पाहणं गरजेचं आहे. अहवाल आल्यानंतरच दोषी किंवा आरोपी कोण आहे हे निश्चित करता येईल. जोपर्यंत अधिकृत रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत वाट पाहावी लागेल.'
पार्थ पवारांबाबत बावनकुळे काय म्हणाले? : पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या निर्णयाबाबत बावनकुळे म्हणाले, 'हा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. खरगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येईल, तो मला देखील मिळाला आहे. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राला तो आम्ही देऊ.' राज्यसभेसाठी शिवसेनेची मागणी आणि आमदारांच्या संख्येबाबत बावनकुळे म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे, आमची चर्चा झाली आहे. 36 आमदारांचा एक खासदार बसतो, अशा स्थितीत चार खासदार भाजपाचे असतील. शिंदे साहेबांशी चर्चा सुरू आहे.'
'रोहित पवारांनी असं बोलू नये' : बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्या विधानावर आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं, 'माझा असा विचार आहे की किमान रोहित पवार यांनी तरी अशा प्रकारे बोलू नये. लोकशाहीत त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र अधिकृत रिपोर्ट येईपर्यंत काहीही बोलता येणार नाही.'
बावनकुळे यांनी पुढे म्हटलं की, 'भाजपा आणि अजित पवार हृदयापासून एकत्र आले होते, त्यामुळे आता भाजपा आणि आमच्याबद्दल रोहित पवारांनी बोलू नये. इतर कोणाबद्दल बोलायचं असेल तर मला माहीत नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलणं म्हणजे आमच्या हृदयाला दुखावणं आहे. रोहित पवारांनी आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. ते आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यामुळे त्यांचं दुःख समजणं आवश्यक आहे.'
हेही वाचा

