Chakan MIDC : चाकणला महानगरपालिका की इंडस्ट्रियल टाऊनशिप? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष
चाकणचा कोंडीमुक्त विकास करण्यासाठी 'स्वतंत्र महानगरपालिका' की 'इंडस्ट्रियल टाऊनशिप' स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Published : September 1, 2026 at 1:26 PM IST
पुणे (चाकण) : चाकण एमआयडीसीमधील (MIDC) तब्बल 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे, येथील औद्योगिक आणि नागरी प्रश्नांनी पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वाढत्या औद्योगिकीकरणाच्या तुलनेत कमी पडणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकणकर त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, आता चाकणमध्ये महानगरपालिका स्थापन करायची की इंडस्ट्रियल टाऊनशिप उभी करायची, याविषयीच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.
चाकणला स्वतंत्र महानगरपालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांकडून केली जात आहे. प्रस्तावित महानगरपालिकेत केवळ चाकणच नाही, तर राजगुरूनगर, आळंदी आणि लगतच्या सुमारे 50 गावांचा समावेश करण्याची चर्चा आहे. असा निर्णय झाल्यास, या संपूर्ण परिसराचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चाकण हे देशातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक बनलं आहे. मोठ्या कंपन्यांसोबतच हजारो लघु आणि मध्यम उद्योग या परिसरात कार्यरत आहेत. मात्र, उद्योगांची संख्या आणि लोकसंख्या वाढत असताना, त्या प्रमाणात रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. परिणामी, रोजच्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका कामगार, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे.
याच प्रश्नावर 'चाकण वाहतूक कोंडीमुक्त कृती समिती' आणि स्थानिक ग्रामस्थ सातत्यानं आवाज उठवत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे चाकणकरांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री या मागणीबाबत अनुकूल निर्णय घेतील, अशी आशा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून चाकण महानगरपालिकेची चर्चा सुरू असूनही प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीसा संभ्रम आणि नाराजीही आहे. 8 ऑगस्ट 2025 रोजी तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण परिसरासाठी महापालिकेबाबत घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांकडून या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हीच चर्चा सुरू झाल्यानं चाकणकर सावध भूमिका घेत आहेत. केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष निर्णय घेऊन चाकणच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
चाकणला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला किंवा इंडस्ट्रियल टाऊनशिपचा पर्याय स्वीकारला, तरी स्थानिकांचा भर मात्र एकाच गोष्टीवर आहे, तो म्हणजे नियोजनबद्ध विकास आणि वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता. मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेतल्यास, चाकणसोबतच राजगुरूनगर, आळंदी आणि लगतच्या गावांच्याही विकासाला वेग मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आता चाकणकरांचं हे अनेक वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का? चाकण महापालिका होणार की इंडस्ट्रियल टाऊनशिप? याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री काय घेतात, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -
'चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची 31 तारखेपर्यंत तात्पुरती डागडुजी पूर्ण करण्यात येईल'-उदय सामंत

