ETV Bharat / state

मध्य रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम, फुकट्या प्रवाशांकडून सात महिन्यांत 40.59 कोटी वसूल

रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली असून, एप्रिल ते ऑक्टोबर 2025 सात महिन्यात 9.63 लाख फुकट्या प्रवाशांकडून 40.59 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Central Railway special ticket checking campaign
मध्य रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 23, 2025 at 3:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई – मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटलं जातं. सुमारे 60 लाख मुंबईकर दररोज लोकलने प्रवास करतात. यात मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या सुमारे 31 लाख आहे. मात्र, यातील सर्वच प्रवासी अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करतात, असे नाही. अशा फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे एप्रिल 2025 पासून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली असून, एप्रिल 2025 ते ऑक्टोबर 2025 या सात महिन्यात 9.63 लाख फुकट्या प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम : याबाबत रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, कार्यालयीन वेळेत प्रवाशांची संख्या खूपच जास्त असते. यात अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्याचा त्रास अधिकृत तिकीट आणि पासने प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेचा मुंबई विभाग नियमितपणे मेल/एक्सप्रेस गाड्या, उपनगरीय एसी आणि नॉन-एसी लोकल गाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवलीय. या विशेष मोहिमांमुळे केवळ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारण्यास मदत होत नाही तर इतर अनधिकृत प्रवाशांनाही रोखता येते.

फुकट्या प्रवाशांकडून 33.69 कोटी रुपयांचा दंड वसूल : मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात एप्रिल 2025 ते ऑक्टोबर 2025 या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी एसी लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या 71,045 फुकट्या प्रवाशांकडून 2.28 कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून, फस्ट क्लास म्हणजे प्रथम श्रेणीने विना तिकीट प्रवास करणाऱ्या 91,837 फुकट्या प्रवाशांकडून 2.93 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर द्वितीय श्रेणी म्हणजेच जनरल डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6,98,248 फुकट्या प्रवाशांकडून 33.69 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

प्रत्येक फेरीत तिकीट तपासणी पथक तैनात : यात मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये भाड्यातील फरकाच्या म्हणजेच जनरल डब्याचे तिकीट घेऊन स्लीपर किंवा एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या 13,301 प्रवाशांकडून 71 लाख रुपयांचा दंड तर, बुक न केलेल्या सामानाच्या 88,713 प्रकरणांमध्ये 98 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरीय नेटवर्क दररोज 1,810 सेवा चालवते. यात 80 एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक फेरीत तिकीट तपासणी पथक तैनात करण्यात आलेली आहेत. हे एसी तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी 368 प्रवाशांवर कारवाई करते आणि 1.19 लाख रुपयांचा दंड वसूल करत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

दंड टाळण्यासाठी वैध तिकिटे बाळगण्याचे आवाहन : याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, मध्य रेल्वे प्रवाशांना सन्मानाने आणि जबाबदारीने प्रवास करण्याचे आणि गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी वैध तिकिटे बाळगण्याचे आवाहन करते. विना तिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे शून्य सहिष्णुता धोरण असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सन्मानाने प्रवासाची अनुभूती देण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.”

हेही वाचाः