ETV Bharat / state

मध्य रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार नाहीत- मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

1 जूनपासून विविध स्थानकांवरील स्टॉलवरील पदार्थांचे दर वाढणार असल्याचा दावा काही माध्यमांमध्ये करण्यात आला होता.

Representative Photo
प्रतिकात्मक फोटो (ETV Bharat File)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2026 at 5:40 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रवाशांना आणखी एक धक्का बसणार आणि 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या स्थानकांवर उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ आणि पेयेही महागणार असं बोललं जात होतं. पण आता याबाबत खुद्द मध्य रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या दरवाढीबाबत समोर आलेली बातमी चुकीची असल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. खाद्यपदार्थ महागण्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचंही रेल्वे प्रशासनानं सांगितलं.

दर वाढणार नाहीत- मध्ये रेल्वेचं स्पष्टीकरण : 1 जूनपासून विविध स्थानकांवरील स्टॉलवरील पदार्थांचे दर वाढणार असल्याचा दावा काही माध्यमांमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार वडापाव, समोसा आणि इतर पदार्थ महागल्याचं तसेच त्यासंदर्भातील परिपत्रकही प्रसारित झाल्याचे सांगितलं गेलं. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

समोसा, वडापाव, पाव, मिसळ पाव, भेळ, रगडा पाव तसेच सँडविच, इडली-सांबार आणि मसाला डोसा यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित परिपत्रकानुसार समोसा आणि वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये, पाव 3 रुपयांवरून 5 रुपये, मिसळ पाव 20 रुपयांवरून 25 रुपये, सुखी भेळ 20 रुपयांवरून 25 रुपये, तर रगडा पाव 20 रुपयांवरून 25 रुपये होणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र, हे सर्व बदल अधिकृत नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

'अफवांवर विश्वास ठेवू नये' : मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, जर कोणतीही दरवाढ करण्यात आली असती, तर त्याची अधिकृत माहिती रेल्वेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली असती. सध्या अशा कोणत्याही दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच त्यावर कोणतीही अधिकृत चर्चा देखील झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मध्य रेल्वेनं कोणताही असा निर्णय घेतलेला नाही. ज्या दरवाढीची माहिती समोर आली होती ती केवळ कथित परिपत्रकावर आधारित होती आणि ती अधिकृत नव्हती.

व्हायरल परिपत्रकाचा दर

  • वडापाव: 13 रुपये 20 रुपये
  • समोसा: 13 रुपये 20 रुपये
  • पाव: 3 रुपये 5 रुपये
  • मिसळ पाव: 20 रुपये 25 रुपये
  • रगडा पाव: 20 रुपये 25 रुपये
  • सुखी भेळ: 20 रुपये 25 रुपये

मात्र, मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे की अशी कोणतीही दरवाढ मंजूर केलेली नाही, हा निर्णय झाला नाही आणि सध्या दरवाढीचा कोणताही विचारही नाही.