ETV Bharat / state

माजी आमदार विप्लव बाजोरिया आणि गोपीकिसन बाजोरियांविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात अडथळा आणणं, शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून आणि शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

Case Registered Against Former MLA Viplav Bajoria and Gopikisan Bajoria
गोपीकिसन बाजोरियांविरुद्ध गुन्हा दाखल (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 12:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती- अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोंधळाप्रकरणी माजी आमदार विप्लव बाजोरिया, त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया आणि आणखी एका सहकाऱ्याविरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात अडथळा आणणं, शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून आणि शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

असं आहे प्रकरण? : एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार दोन जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या बैठकीदरम्यान बाजोरिया पिता-पुत्रांनी गोंधळ घातल्याचा म्हटलं. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक 2026 संदर्भातील नामनिर्देशन अर्जाची छाननी सुरू होती. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार विप्लव बाजोरिया आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या सभागृहात पोहोचले. बाजोरिया यांनी आपल्या नामनिर्देशन अर्जासंदर्भात आक्षेप घेतल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्यांची वाद, धमकीचा आरोप : या संपूर्ण प्रकरणात निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नामनिर्देशन अर्जावर घेतलेल्या निर्णयाबाबत संताप व्यक्त करत बाजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला. अधिकाऱ्यांना अपशब्द वापरून बोलणं, निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकणं आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. यासह बाजूला यांचे वडील गोपीकिसन बाजोरिया यांनीही अधिकाऱ्यांची वाद घालत कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काही समर्थकांनी देखील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

निवडणूक प्रक्रियेत अडथळा : तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणामुळे नामनिर्देशन अर्ज छाननीची प्रक्रिया काही काळ‌ विस्कळीत झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना आपलं काम सुरळीतपणे करता आलं नाही. त्यामुळं शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचं तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांकडून तपास सुरू : घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास गाडगे नगर पोलिसांनी सुरू केला आहे.

निकालाची प्रत मागणं हा आमचा गुन्हा : निवडणूक अर्जावर निकाल देण्याचा अधिकार जसा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा आहे, तसाच या निकालाची प्रत मागण्याचा अधिकारही माझा आहे. या निर्णयाला मला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे आहे. मला अजूनही निकालाची प्रत मिळालेली नाही. निकालाची प्रत मागणे गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, असे विप्लव व गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितलं. आमच्यासमोर जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचाः

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल पोखरतेय युवा पिढी, मुंबई पोलिसांच्या कारवाईत दोन राज्यांमधून 100 कोटींचा मुद्देमाल जप्त

मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत जोरदार हजेरी; उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा