ETV Bharat / state

पुण्यात व्यापाऱ्याच्या मुलाचं भरदिवसा अपहरण; पोलिसांनी वेळीच नाकाबंदी केल्यानं झाली सुखरुप सुटका

मंगळवारी दुपारी कापूरहोळ इथून एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलाची सुटका केली. परंतु आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

BUSINESSMAN SON KIDNAPPING
पुण्यात व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 6:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बारामती : पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः थरारून गेला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचं भरदिवसा अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, जेजुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळं काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं.

परिस्थितीनं घेतलं नाट्यमय वळण : याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कापूरहोळ इथून एमएच 12 एक्सई 5353 या क्रमांकाच्या कारमधून युवकाचं अपहरण करण्यात आलं. हा प्रकार अचानक घडल्यानं गावात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, तर ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीचा संदेश देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी निरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जेऊर-निरा मार्गावर तत्काळ नाकाबंदी उभारली. प्रकरणातील संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडं जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकानं वेग वाढवला. मात्र अरुंद रस्ता आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळं कार उसाच्या शेतात जाऊन कार अडकली. यानंतर परिस्थितीनं नाट्यमय वळण घेतलं. अपहरणकर्त्यांनी ऊसाच्या पिकाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पण, पोलिसांनी तत्परतेनं कारमधून युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून तो सुखरूप असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केल्यामुळं मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे. - सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे

आरोपींच्या अटकेकडं सर्वांचं लक्ष : दरम्यान, अपहरणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे. मुलाच्या अपहरणामागं पाठीमागं आर्थिक वाद, खंडणी की वैयक्तिक वैर अशा सर्व शक्यतांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या धाडसी कारवाईमुळं कापूरहोळ परिसरानं सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी आरोपींच्या अटकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 'रंग बरसे' कार्यक्रमात विशेष मुलांनी लुटला आनंद!
  2. मुंबईत होळीचा उत्साह शिगेला; सर्वत्र संगीत, मस्ती आणि तगडा पोलीस बंदोबस्त
  3. खग्रास चंद्रग्रहणानिमित्त साईबाबा दर्शन साडेतीन तास बंद, मंदिरात मंत्रोच्चार-जप सुरू