अवघ्या 22 मिनिटांत अडीच कोटी रुपयांची घरफोडी, 247 तोळे दागिन्यांसह 65 लाखांवर चोरट्याने मारला डल्ला
सर्व कुटुंबीय मुलाच्या साखरपुड्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गेलेले होते. घरात कुणीही नसल्याचे बघून चोरट्याने संधी साधली.


Published : January 22, 2026 at 2:05 PM IST
नागपूर - नागपुरात एका बंगल्यात धाडसी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडलीय. अवघ्या 22 मिनिटांच्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल अडीच कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या मुद्देमालावर हात साफ केलाय. नागपूरच्या राजनगर परिसरातील बलजिंदर सिंग नय्यर यांच्या बंगल्यात धाडसी घरफोडी झालीय, उपलब्ध सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या चोरट्याचा शोध घेतला जात आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा राजनगर परिसर अतिशय उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राहणारे बलजिंदर सिंग नय्यर कुटुंबीयांच्या घरी 19 जानेवारीला घरफोडीची घटना घडली. बलजिंदर सिंग नय्यर यांच्या लहान मुलाचा साखरपुडा असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात असताना ही घरफोडी झालीय. सर्व कुटुंबीय मुलाच्या साखरपुड्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गेलेले होते. घरात कुणीही नसल्याचे बघून चोरट्याने संधी साधली.
247 तोळ्यांसह 65 लाख रुपयांवर डल्ला- 20 तारखेला रात्री सव्वा आठनंतर हा चोरटा मागच्या बाजूने बंगल्यात शिरला. बंगल्यातील सीसीटीव्हीवर कापड झाकला, त्यानंतर किचनची ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश केलाय. आतमध्ये शिरल्यावर तो बेडरूममध्ये पोहोचला आणि कपाटाच्या किल्ल्या शोधून कपाट उघडले. त्यानंतर चोरट्याने 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे ब्रेसलेट, सोन्याची नाणी यासह इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. तो चोरटा एवढ्यावरच थांबला नाही तर बलजिंदर सिंग नय्यर यांच्या दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन चोरट्याने 65 लाख रुपयांवरही डल्ला मारलाय.
22 मिनिटांमध्ये अडीच कोटींची घरफोडी - अवघ्या 22 मिनिटांमध्ये ही घरफोडीची घटना घडलीय. बंगल्यातील सीसीटीव्हीनुसार अज्ञात चोरट्याने बंगल्यात रात्री 8.12 वाजता प्रवेश केला आणि 8.34 मिनिटांनी तो बाहेर पडला. बंगल्यातील सर्वच गोष्टींची इत्यंभूत माहिती असल्याशिवाय चोरी शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरीच्या या घटनेत आतील कोणाचा समावेश आहे का या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.
आरोपीकडे घरातील सर्व माहिती - बलजिंदर सिंग नय्यर हे व्यावसायिक असून, ते 15 वर्षांपासून राजनगरमध्ये याच बंगल्यामध्ये राहत आहेत. आरोपी चोरट्याचे वय 30 ते 40 च्या दरम्यान असून, त्याने तोंडाला कापड बांधले होते. ज्याप्रमाणे चोरट्याने बंगल्यात शिरून चोरी केली, त्यावरून बंगल्याच्या आत आणि बाहेरील इत्यंभूत माहिती असल्याची शंका आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास नय्यर कुटुंबीय घरी पोहोचल्यावर चोरीची घटना उघडकीस आली, त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

