ETV Bharat / state

आश्चर्यकारक! महिलेनं घरीच दिला एकाच वेळी 4 बाळांना जन्म; पाचही जणांची प्रकृती सुखरुप

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचा प्रश्न समोर आला आहे. महिलेनं घरीच चार बाळांना जन्म दिला आहे.

Buldhana woman delivers quadruplets
संग्रहित- जळगाव जामोद रुग्णालय (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 6, 2026 at 9:33 AM IST

|

Updated : August 6, 2026 at 2:10 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा- जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या आदिवासी बहुल भागातील चारबन गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना घडली आहे. गावातील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना, घरीच प्रसूतीदरम्यान एकाच वेळी तीन मुले आणि एक मुलगी अशा चार बालकांना जन्म दिला. ही घटना वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ मानली जाते. कारण सामान्यतः अशा प्रसूतींमध्ये रुग्णालयातील विशेष सुविधांची गरज भासते. मात्र, रियानी यांनी घरीच, अत्यंत कठीण परिस्थितीत यशस्वीपणे प्रसूती पूर्ण केली.



प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि चारही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचं आढळलं. बालकांचे वजन 900 ग्रॅम ते एक किलोदरम्यान असल्यानं त्यांना पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी तातडीनं खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही घटना असल्यानं मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणं स्वाभाविक आहे. सध्या, खामगाव येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता आणि चारही बालकांवर उपचार सुरू आहेत.

चार बाळांना महिलेनं दिला जन्म (Source- ETV Bharat Reporter)



ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय टीमनं या प्रकरणात वेळेवर माता आणि बाळांना सुरक्षित ठेवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली आहे. आदिवासी भागातील अशा कठीण परिस्थितीतही यशस्वी प्रसूती झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. रियानी आणि तिच्या चारही बाळांच्या आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ही घटना दुर्मिळ असली तरी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य सुविधांच्या गरज व्यक्त होत आहे.

झारखंडमध्येही महिलेनं दिला होता चार बाळांना जन्म- झारखंडमध्ये झालावाड शहरात सरकारी प्रसूती रुग्णालयात एका महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना जुलै 2026 मध्ये घडली. जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागात (NICU) दाखल असलेल्या या 25 वर्षीय महिलेनं तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर मातेची प्रकृती पूर्णपणे सामान्य आणि स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Last Updated : August 6, 2026 at 2:10 PM IST