बुलढाणा जिल्हा पोलिसांची 'ऐतिहासिक' कामगिरी; वर्षभरात 19.19 कोटींचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

Published : July 3, 2026 at 7:04 PM IST
बुलढाणा - जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा पोलीस दलाने वर्ष २०२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कुशल नेतृत्वाखाली एकूण १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 'मिशन परिवर्तन' सारख्या अभिनव उपक्रमाने तर युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
वर्षभरातील जिल्हा पोलिसांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा -
गुन्हे उकल आणि मोठ्या गुन्ह्यांवर नियंत्रण - जिल्ह्यात दाखल झालेल्या खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांपैकी ७९ टक्के गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या तपास प्रक्रियेदरम्यान ४ कोटी ७ लाख ६१ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.याशिवाय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फरार असलेल्या ३८ सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.
'मिशन परिवर्तन' - अमली पदार्थांविरुद्ध निर्णायक लढा - युवकांना ड्रग्सच्या दाहक विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'मिशन परिवर्तन' या विशेष मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले. या मोहिमेद्वारे ५५ केसेस नोंदवून ५८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२४.८४६ किलो गांजा व अफू जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची एकूण किंमत १ कोटी ९९ लाख ७८ हजार ८५० रुपये आहे.केवळ अटक आणि जप्तीपुरते मर्यादित न राहता, या मोहिमेत पथनाट्यांच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती करण्यात आली, ज्यामुळे समाजातील तरुण पिढीला सकारात्मक संदेश मिळाला.
गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई - सराईत गुन्हेगारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ ते ५७ अंतर्गत ८९ प्रस्ताव सादर करण्यात आले. अत्यंत कडक एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत १३ प्रस्ताव सादर करून ५ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले. तसेच संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ अन्वये ४ गुन्हे दाखल करण्यात आले.
अवैध धंदे, तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांवर कारवाई - अवैध दारू आणि जुगाराच्या धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. मद्यबंदी कायद्यांतर्गत १९८१ केसेस करून २०२८ आरोपींना अटक करण्यात आली. यात ६६.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार प्रकरणात ८४२ केसेसमध्ये १२१५ आरोपी ताब्यात घेण्यात आले, ज्यात ४०.२४ लाख रुपयांचा साठा जप्त केला. अवैध रेती (गौण खनिज) तस्करीच्या ५३ केसेसमध्ये १०१ आरोपींना अटक करून वाहनांसह ५ कोटी ७८ लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित गुटखा तस्करीच्या १२ केसेसमध्ये १४ आरोपी ताब्यात घेतले असून, १ कोटी ८ लाख ३९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत १९ केसेस करून ४ पिस्तूल, ४ मॅगझीन, १०० काडतुसे, चाकू, तलवारी व वाहनांसह ४५.९६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
मानवतावादी आणि सामाजिक कार्य - पोलीस दलाने केवळ गुन्हेगारी रोखण्यापुरतेच काम केले नाही, तर मानवतावादी दृष्टिकोनातूनही उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्ह्यातील अपहरणाच्या ११० प्रकरणांमध्ये ७९ मुली आणि १२ मुलांसह एकूण ९१ बालकांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
७१८ बेपत्ता व्यक्तींपैकी ५१२ जण (३६६ महिला व १४६ पुरुष) सुखरूप घरी परतले.
नागरिकांच्या हरवलेल्या २१७ मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले.
सायबर सुरक्षा आणि आर्थिक संरक्षण - सायबर सेलने फसवणूक झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. एका तक्रारदार सचिन विनायक जपे यांना ८ लाख ५७ हजार ४७० रुपये परत मिळवून दिले. NCCRP पोर्टलद्वारे इतर ११ तक्रारदारांचे ८ लाख ७० हजार ६६८ रुपये परत मिळवले. एकूण १७ लाख २८ हजार १३८ रुपये नागरिकांना परतावा देण्यात आला.
वाहतूक शिस्त आणि न्यायालयीन यश - वाहतूक नियमांचे पालन वाढवण्यासाठी ५५,९२९ केसेस दाखल करून ४ कोटी १४ लाख ४६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला. 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या ११२ केसेस करण्यात आल्या. पोलीस आणि कोर्ट यांच्यातील समन्वयामुळे JMFC कोर्टात २१७२ केसेसमध्ये ६.६१ लाख रुपयांचा दंड वसूल झाला, तर जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक आरोपींना कठोर शिक्षा झाली.""बुलढाणा जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे, असे सांगताना पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, 'मिशन परिवर्तन' आणि कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावली असून, गुन्हेगारांना जिल्ह्यात कुठेही थारा दिला जाणार नाही.बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या या उत्तुंग कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

