ETV Bharat / state

बुलढाणा पोलिसांची पुन्हा नाचक्की; मृत घोषित केलेली 'ती' मुलगी जिवंत, प्रकरणात नवा ट्विस्ट!

जळगाव जामोद पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी वडील-भावाला अटक केली. ती मुलगी जिवंत पोलीस ठाण्यात हजर झाली. आता या धक्कादायक प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.

BULDHANA GIRL CASE
बुलढाणा पोलिसांची नाचक्की (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2026 at 2:59 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली होती. जळगाव जामोद पोलिसांनी विवाहित मुलीची हत्या झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिचे वडील आणि भावाला अटक करून तुरुंगामध्ये टाकलं होतं. परंतु ती मुलगी प्रत्यक्षात जिवंत निघाली. मृत घोषित केलेली ही मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं बुलढाणा पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. आता या प्रकरणात आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे.

...म्हणून दिली कबुली : बुलढाणा जिल्ह्यात एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणानं मोठा ट्विस्ट घेतला आहे. गावातील तरुणासोबत पळून गेल्याच्या संतापातून वडिल आणि भावानं मुलीचा खून केल्याची कथित कबुली दिली होती. मात्र, महिनाभरानंतर ती मुलगी जिवंत समोर आल्यानं संपूर्ण प्रकरणच वेगळ्या वळणावर पोहोचलं. (बुऱ्हानपूर) खडकी येथील एक मुलगी गावातीलच एका तरुणासोबत गेली होती. याचा राग मनात धरून तिचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांनी पोलिसांना शिवानीचा खून करून मृतदेह जाळल्याची कथित कबुली दिली. या कबुलीनुसार दोघांनाही अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं.

बुलढाणा प्रकरणात नवा ट्विस्ट : मात्र, तब्बल एक महिन्यानंतर शिवानी जिवंत असल्याचे समोर आलं. ती पोलिसांसमोर उभी राहिल्यानं बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी बाप-लेकांवर दबाव टाकून कबुली घेतल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. कारागृहातून सुटका झाल्यानंतर बापूराम कळमेकर यांनी पोलिसांना पूर्ण क्लीन चिट दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मुलगी पळून गेल्यानं आमची मानसिक स्थिती खराब झाली होती. संतापाच्या भरात आम्ही पोलिसांना चुकीची माहिती दिली. पोलिसांनी आमच्यावर कोणताही दबाव टाकला नव्हता."

पोलिसांसमोर आव्हान : जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील स्त्री देह कुणाचा आहे? हत्या कोणी केली? या प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करत आहेत. लवकरच खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे प्रकरण पोलिसांच्या तपास यंत्रणेची विश्वासार्हता तपासणारे ठरलं आहे. एकीकडं कुटुंबातील भावनिक संतापामुळं खोटी कबुली, तर दुसरीकडे अपरिचित महिलेचा मृतदेह यामुळे पोलिसांना दोन बाजूनं आव्हान उभं राहिलं आहे.