ETV Bharat / state

बुलढाण्यात बॅनर वॉर, मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या होर्डिंगवरून राडा; शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याचा प्रयत्न?

बुलढाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री तीव्र राडा झाला.

Buldhana Banner Dispute
बुलढाण्यात गायकवाड-महाले समर्थकांतील वाद थेट पोलीस ठाण्यात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 30, 2026 at 5:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकीय कलगीतुरा थांबण्याचं नाव घेत नाहीये. चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यात मतदारसंघात पक्षविस्तार आणि पक्षप्रवेशावरून वारंवार खटके उडत असल्याचं चित्र आहे. आता या राजकीय वादात आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडल्यानं महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या 1 सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात कट-आऊट्स आणि बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरबाजीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी वाद घालून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना मंदार बाहेकर (ETV Bharat)

बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भाजपाचे बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक विकी आव्हाड यांच्यासह सात ते आठ व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 189, 296 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण आणि शक्तिप्रदर्शन सर्वसामान्यांसाठी चर्चेचं विषय ठरत आहेत.

पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचं आक्रमण आणि स्थानिक प्रभाव या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बॅनर प्रकरणामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. आता हे प्रकरण पोलीस कारवाईपर्यंत पोहोचल्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते, म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लक्ष घालून वाद शमवणार, की बुलढाण्यातील हा राजकीय वाद आणखी विकोपाला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून संयम राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

  1. एमपीएससीने माहितीसह केलेल्या आरोपांवर विश्वास का ठेवला नाही, औषध निरीक्षक पद परीक्षेसंदर्भात तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याची खंत
  2. MPSC पेपरफुटी : 'अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा...'; आमदार रोहित पवारांचा पुण्यातून थेट अल्टिमेटम