ETV Bharat / state

वसईत भावाचा बहिणीवर गोळीबार : आरोपीकडं आढळून आलं पिस्तूल, जिवंत काडतुसं अन् हॅन्ड ग्रेनेड

वसईत संपत्तीच्या वादातून भावानं बहिणीवर गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या भावाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आलं.

BROTHER FIRE ON SISTER IN VASAI
आरोपी शिवशंकर राम मुरत विश्वकर्मा उर्फ बबलू (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 3:53 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : मालमत्तेवरुन बहिणीवर गोळीबार करणाऱ्या भावाला वसई पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पिस्तूल, जिवंत राऊंडसह एक हँड ग्रेनेड जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली. पुष्पा अशोक विश्वकर्मा असं गोळीबारात जखमी झालेल्या बहिणीचं नाव आहे. तर शिवशंकर राम मुरत विश्वकर्मा उर्फ बबलू (40) असं गोळीबार करणाऱ्या आरोपी भावाचं नाव आहे. अटक केल्यानंतर त्याला वसईतील वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Brother Fire On Sister In Vasai
आरोपी भाऊ (ETV Bharat Reporter)

मालमत्तेवरुन बहिणीवर भावाचा गोळीबार : वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पुष्पा अशोक विश्वकर्मा (42 रा. राठी संघमित्र चाळ, रूम नंबर 02, विराट मेडिकल, वाघरळ पाडा, बोगदा पाडा वसई ) यांच्यावर रात्री 3 वाजता त्यांचा भाऊ आरोपी शिवशंकर राम मुरत विश्वकर्मा उर्फ बबलू (40 रा. रूम नंबर एस- 21 /5707 गल्ली नंबर 04, भारत नगर, रमाबाई कॉलनी, घाटकोपर पूर्व, मुंबई ) यानं गोळीबार केला, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण म्हात्रे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला दिली. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करीत असताना आरोपी हा त्याच्या मुंबईतील घरी आढळून आला नाही. वालीव पोलिसांनी आरोपी शिवशंकर उर्फ बबलू याला पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषण केलं. यावेळी आरोपी शिवशंकर उर्फ बबलू हा मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरात साबेगाव इथं असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली, अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण म्हात्रे यांनी दिली.

आरोपीकडं आढळून आलं हँड ग्रेनेड : आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं प्राप्त माहितीवर पोलीस चाळ नंबर 29 रूम नंबर 9 साबे गाव दिवापूर्व इथं पोहचले. यावेळी आरोपी शिवशंकर उर्फ बबलू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडं असलेल्या स्कुटीच्या डिक्कीची तपासणी केली असता, एक गावठी पिस्टल आणि जिवंत राऊंड मिळून आले. तसेच स्टीलच्या डब्यामध्ये गंजलेलं जुनं हॅण्ड ग्रेनेड मिळून आलं. मुंब्रा पोलिसांनी त्वरित बीडीडीएस पथक घटनास्थळी बोलवलं. सदर बाबत हॅण्ड ग्रेनेड सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. वसई पोलिसांनी आरोपी शिवशंकर उर्फ बबलू याला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात रवाना झाले. या घटनेची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; सुरक्षारक्षक जखमी
  2. बोंडी बीच फायरिंग : अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतावाद्याची बंदुक हिसकावली; सिडनीच्या हिरोचं जगभरात कौतुक
  3. कॉलेजच्या भांडणातून झाला राडा; विद्यार्थ्यांनी वडिलाच्या पिस्तुलातून वर्गमित्रावर झाडली गोळी