ETV Bharat / state

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; हायकोर्टानं निकाल राखून ठेवला, आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद?

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतिश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. वाचा, सविस्तर बातमी

Bombay high court
संग्रहित-मुंबई उच्च न्यायालय (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 28, 2026 at 5:26 PM IST

|

Updated : August 28, 2026 at 6:16 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण करत हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवलाय. दिशाचे वडील सतिश सालियन यांनी आपल्या याचिकेतून आरोप केलाय की, आपली मुलगी दिशानं आत्महत्या केलेली नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलीय. आपली तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीत. राज्य सरकारनं आपली बाजू मांडताना कोर्टात स्पष्ट केलंय की, मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हे केवळ आत्महत्येचंच प्रकरण आहे. तर यात हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आदित्य ठाकरेंच्यावतीनं आपल्याला यात राजकीय वैमनस्यातून गोवलं जात असल्याचा दावा केलाय.



मला केवळ राजकीय वैमनस्यातून गोवलं जातंय, आदित्य ठाकरेंचा दावा - आदित्य ठाकरेंच्यावतीनं ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी स्पष्ट केलं की, याप्रकणी आपल्याला केवळ यात राजकीय हेतूनं गोवण्यात आलंय. त्यामुळे यात आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच कुणाच्याही सांगण्यावरून यात कारवाई करणं योग्य ठरणार नाही. रशीद खान पठाण यांनी तक्रार केली तेव्हा सतीश सालियन यांच्यावतीनं कुठलीही तक्रार दिलेली नव्हती. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे वाट्टेल तसे आरोप करणं हा यामागील मूळ हेतू दर्शवतो. केवळ राजकीय वैरातून सूड उगवण्यासाठीच हे आरोप करण्यात आलेत. दरम्यान याचिकेच्या सुनावणीदरम्यान राणेंच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी केवळ राजकीय हेतूनं प्रेरित होत आपल्यावर आरोप केल्याचंही आदित्य ठाकरेंच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं. आम्हाला याचिकाकर्त्यांबाबत पूर्ण सहानभूती आहे. त्यांच्या शंकेचं निरासन होऊन त्यांना त्यांची उत्तर मिळालीच पाहिजेत, या मताचे आम्हीही आहोत. दिशाच्या वडिलांच्या बाबतीत पूर्ण संवेदना आहेत. पण त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून जे काही राजकारण सुरू आहे, ते थांबायला हवं, असे आदित्य राणेंच्या वकिलांनी युक्तावीदात म्हटलं.

सतिश सालियन यांच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद? (Source- ETV Bharat Reporter)



दिशाच्या मृत्यूवरून हायकोर्टाचे सवाल - पंचनाम्यात दिशाच्या मृतदेहावर कपडे नसल्याच्या उल्लेखावरून शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांना सवाल विचारला. दिशाच्या शरीरावर कपडे नव्हते, असा हॉस्पिटलमधील पंचनाम्याचा उल्लेख आहे?, मग ते कपडे कोणी काढले होते? त्या डॉक्टरांचा जबाब का नाही?, असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला. त्यावर यात काहीही तथ्य नसल्याचं सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केलं. यावर दिशाचा आत्महत्येनंतरचा रुग्णालयातला फोटो सरकारी वकिलांनी कोर्टात दाखवला. यात तिनं कपडे घातले होते. मात्र या फोटोवरूनही कोर्टानं सवाल उपस्थित केला की, एवढ्या उंचावरून पडूनही फक्त तोंडातूनच रक्त आलं?, तोंडावर आणि शरीरावर बाकी कुठल्याही मोठ्यी जखमा का दिसत नाहीत? त्यावर सरकारी वकीलांनी सांगितलं की दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती. तिचा स्कल फ्रॅक्चर होता. जबड्यालाही मोठा मार लागला होता. तसेच अन्यही जखमा होत्या. यावर हायकोर्टानं स्पष्ट केलं की, आम्हाला या प्रकरणात आताच कोणतेही निष्कर्ष काढायचे नाहीत. पण, यात संशय घेण्यासारखं खरंच काही आहे का?, हे तपासणंही महत्त्वाचं आहे.



दिशाचा संशयास्पद मृत्यू आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर सवाल -दिशाच्या वडिलांनी याचिकेत म्हटलंय की, दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला. तिनं 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा करण्यात आला. मात्र, दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलीसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशीर केला. दिशाचा मृतदेहदेखील आम्हाला फारकाळ ठेवू दिला नाही. घाईघाईत त्याचे अंतिमसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं. घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटिव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही, असे आरोप करत या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावरही सवाल उठवण्यात आले आहेत.



सतिश सालियन यांचे काय आहेत आरोप- दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती. ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला, असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र, तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्टच खरी असल्याचं सतत आपल्यापुढे रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती, असा आरोपही सालियन यांनी आपल्या याचिकेतून केलाय. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्याचा दावाही सतिश सालियन यांनी या याचिकेतून केलाय.



आदित्य ठाकरेंवरही याचिकेतून गंभीर आरोप - प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र, अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली. त्या पार्टीचा माहोलच बदलला. याच लोकांनी दिशाचा सामूहिक बलात्कार केल्याचा गौप्यस्फोटही सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वारंवार केलेला आहे. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं. या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेत आहे.



याचिकेतील प्रमुख मागण्या - सालियन यांनी याचिकेत म्हटलं की, हे सर्व माहिती असूनही राज्याचे प्रमुख या नात्यानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्ती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशा घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. एनआयए किंवा सीबीआयमार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, या याचिकेतील प्रमुख मागण्या आहेत.

हेही वाचा-

  1. "मुलगी गमावलेल्या वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत", सतिश सालियन यांच्या याचिकेवर हायकोर्टाची भूमिका
  2. दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात सुनावणीला सुरूवात, गुरूवारपर्यंत सारे युक्तिवाद पूर्ण करण्याची हायकोर्टाकडून सूचना
  3. दिशा सालियनचे वडील मुलीच्या मृत्यूबाबत तक्रार देतात, तर रितसर गुन्हा दाखल करून तपास करण्यात काय अडचण? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Last Updated : August 28, 2026 at 6:16 PM IST