ETV Bharat / state

मुंबई उच्च न्यायालयाची FDA ला तंबी; MCAच्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

न्यायालयाच्या आदेशानंतरही FDAने MCA च्या बाबतीत भूमिका कायम ठेवल्यास अधिक कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशाराही खंडपीठानं दिला.

Bombay High Court Relief to MCA
MCAच्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 3:12 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अन्न व औषध प्रशासनानं (FDA) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा कठोर आदेश द्यावे लागतील, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं आज शनिवारी (29 ऑगस्ट) दिला. न्यायालयाच्या आदेशांकडे FDAकडून कानाडोळा केला जात असल्याबद्दल खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर FDAने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) विरोधात बजावलेली कामबंद नोटीस मागे घेण्याची तयारी दर्शवली.

आज शनिवारी प्रभारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं FDAच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. भेसळखोरीविरोधात FDAने केलेल्या कारवाईचं न्यायालयानं वेळोवेळी कौतुक केलं आहे. मात्र, न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही एखाद्या प्रकरणात विनाकारण ताठर भूमिका घेणं योग्य नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं.

'कठोर पावलं उचलावी लागतील' : न्यायालयाच्या आदेशानंतरही FDAने MCA च्या बाबतीत भूमिका कायम ठेवल्यास अधिक कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशाराही खंडपीठानं दिला. त्यामुळे FDAने माघार घेत MCAच्या बीकेसीतील आस्थापनांना बजावलेली कामबंद नोटीस मागे घेण्याची तयारी दर्शवली.

तसेच, संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना रितसर सुनावणीची संधी देण्याचे FDAने मान्य केले. याची नोंद घेत उच्च न्यायालयाने MCAची याचिका निकाली काढली. तसेच बंद करण्यात आलेल्या आस्थापना तत्काळ पुन्हा सुरू करण्यास MCAला परवानगी दिली.

हायकोर्टाने परवाना निलंबनाची कारवाई रद्द केली : मुंबई उच्च न्यायालयानं बीकेसी येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) परिसरातील 5 उपाहारगृहे आणि उपाहारगृहांवरील अन्न परवाना निलंबनाची कारवाई रद्द करत MCAला दिलासा दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 20 ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत स्वच्छतेच्या त्रुटी आढळल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी 5 उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले होते.

FDAने व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता केवळ कागदी कारवाई केल्याबद्दल उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नव्याने करण्यात आलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये 88 टक्के अन्न सुरक्षा नियमांचं पालन होत असल्याचं स्पष्ट झालं. याची दखल घेत न्यायालयानं MCAला संबंधित आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले.

MCA क्लबमध्ये FDAची अचानक तपासणी : बीकेसीतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्लबवर 20 ऑगस्ट रोजी FDAच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली होती. यावेळी परमिट रूमसह स्वयंपाकघराची पाहणी करण्यात आली. किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला आढळून आला. तसेच किचनच्या प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आलं.

FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला नसल्याचंही तपासणीत आढळलं. खाद्यतेलाचा रंग, वास आणि इतर घटकांच्या आधारे केली जाणारी नियमित तपासणी होत नसल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. तसेच भाजीपाला आणि अन्य कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं.

याशिवाय कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या अपेक्षित निकषांचं पालन होत नसल्याचेही तपासणीत समोर आलं. त्यानंतर FDAने नियमांनुसार MCA परिसरातील पाच स्वतंत्र खाद्य आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले होते.