ETV Bharat / state

शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून सुरू केलेली कारवाई योग्यच असल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिलाय.

BOMBAY HIGH COURT
मुंबई उच्च न्यायालय (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 10:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला याबाबत पत्र व्यवहार करून सुरू केलेल्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय.

काय आहे प्रकरण? : पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलंय. त्यामुळे राऊत यांचं नगरसेवक पद जाण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्यावर पुढील सहा वर्ष निवडणूक लढण्यावरही बंदी येऊ शकते. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. याविरोधात विशाखा राऊत यांनी वकील श्रीशैल देशमुख यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत समितीच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिलेला असतानाही महापालिका आयुक्तांना कोणतीही कारवाई सुरू करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी केलेला पत्रव्यवहार हा बेकायदा असल्याचा दावा करून राऊत यांनी महापालिका आयुक्तांच्या पत्रव्यवहाराला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेतून हायकोर्टाकडे केली होती.

राऊत यांचा दावा अमान्य करत हायकोर्टानं फेटाळली याचिका : या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बुधवारी तातडीची सुनावणी झाली. राऊत यांच्या या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या पत्रव्यवहारात कोणतीही बेकायदेशीर बाब दिसत नाही, असं स्पष्ट करत विशाखा राऊत यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

राऊत यांचं नगरसेवकपद सरवणकरांच्या घरात जाणार - विशाखा राऊत : प्रभाग क्रमांक 191 मधील नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांना आता नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाखा राऊत यांच्या विरोधात माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती. दोघांमध्ये प्रचंड अटीतटीची लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांचा विजय झाला होता. तर प्रिया सरवणकर या दोन नंबरच्या ठरल्या होत्या. आता विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं तर प्रिया सरवणकर यांना नगरेसवकपदाची संधी मिळू शकते.

हेही वाचाः