महापालिका निवडणूक 2026: याचिकाकर्त्यांची मुंबई उच्च न्यायालयात रिघ, तातडीच्या सुनावणीस कोर्टाचा नकार
महापालिका निवडणुकीत अनेक घोळ झाल्याबाबतच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला.


Published : January 5, 2026 at 10:27 PM IST
मुंबई : सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. भाजपाच्या बंडखोर उमेदवारानं माघार न घेतल्यानं शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. यासह इतरही काही मुद्यांवर विविध याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात नियमित कामकाज सुरू होताच सुनावणीसाठी आल्या होत्या. मात्र या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय.
काय आहे प्रकरण : शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. प्रतीक्षा नगर येथील प्रभाग क्रमांक 173 भाजपानं शिवसेनेसाठी सोडलाय. तरीही तिथून भाजपाच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळूसकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपानं त्यांना एबी फॉर्म दिलेला नसतानाही केळूसकर यांनी बनावट एबी फॉर्म आपल्या अर्जासोबत सादर केलाय. त्यावर फॉर्म भरतानाही आक्षेप घेण्यात आला होता, मात्र त्याची दखल न घेता निवडणूक अधिकाऱ्यांनी केळूसकर यांचा अर्ज स्वीकारला. याला विरोध करत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
काय होती याचिका : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन केळूसकर यांनी भरलेला अर्ज बाद करावा, अशी प्रमुख मागणी कांबळे यांनी याचिकेत केली होती. केळूसकर यांना निवडणुकीसाठी भाजपाचं कमळ हे अधिकृत चिन्ह देण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी विनंती सकाळच्या सत्रात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. मात्र कांबळे यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यानंतर अन्य काही अश्याच प्रकारच्या निवडणूक याचिकांवर सुनावणीकरता न्यायालयाकडं विनंती करण्यात आली. मात्र यापैकी कोणत्याही याचकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी नकार दिला.
हेही वाचा :
- उमेदवार हजर नसतानाही अर्ज घेतला मागे; 'बिनविरोधसाठी चालला होता खटाटोप', भाजपा बंडखोर उमेदवाराचा गंभीर आरोप
- मुंबई महानगरपालिका निवडणूक : कुलाबामधील तिन्ही प्रभागाच्या 10 उमेदवारांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार!
- इतके नगरसेवक बिनविरोध कसे निवडले; निवडणूक आयोगाच्या विरोधात असीम सरोदेंनी थोपटले दंड, दाखल केली याचिका

