शिवसेना भाजपा वाद भोवला; नवी मुंबईतील 'या' प्रभागाच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. '17-अ' मधील निवडणुकीला स्थगिती दिलीय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.


Published : January 8, 2026 at 9:48 PM IST
मुंबई : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा मनमानी आणि गैरवापर केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. '17-अ' मधील निवडणुकीला स्थगिती दिलीय. याप्रकरणी निवडणूक आयोगाला तातडीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत शुक्रवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी घेण्याचं उच्च न्यायालयानं निश्चित केलंय. मात्र याप्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपातील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
काय आहे प्रकरण : भाजपा उमेदवार निलेश भोजने यांनी नवी मुंबईतील '17 अ' या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. निलेश भोजने यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप असतानाही त्यांचा अर्ज कसा स्वीकारला गेला?, असा सवाल उपस्थित केला होता. याची दखल घेत महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 10(1ड) अंतर्गत भोजनेंचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलाय. याविरोधात भोजने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागत याचिका दाखल केलीय.
उच्च न्यायालयाचे काय आहेत निर्देश : या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भोजने यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितलं की, "निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश हा प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्यानं तो रद्द करण्यात यावा." मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याचं मान्य करत राज्य निवडणूक आयोग, नवी मुंबई महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रभाग क्रमांक 17अ च्या निवडणुकीसंदर्भात तूर्तास कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश जारी करत उद्या शुक्रवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचं मान्य केलंय.
हेही वाचा :

