ETV Bharat / state

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: तपास सीबीआयकडं वर्ग करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडं सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयनं रितसर गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय तपासयंत्रणेला दिलेत.

Disha Salian Death Case
दिशा सालियन मृत्यू प्रकरण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 12:41 PM IST

|

Updated : September 2, 2026 at 3:05 PM IST

5 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडं सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयनं रितसर गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय तपासयंत्रणेला दिलेत. प्रकरण कोणतंही असो सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी ठरवू नये, असं महत्त्वपूर्ण विधान या निकाल वाचनात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोंसले यांच्या खंडपीठानं अधोरिखित केलंय.

मुंबई उच्च न्यायालयाचा काय आहे निर्णय : या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे अधिकारी याचिकाकर्त्याचा जबाब नोंदवतील आणि रितसर गुन्हा दाखल करतील. याचिकाकर्त्याच्या मुलीचा मृत्यू ज्या परिस्थितीत झालाय, त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा तपास सीबीआय करेल. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, एखाद्या व्यक्तीविरुद्ध वाजवी संशय घेण्याजोगी पुरेशी कारणं आहेत असं तपास अधिकाऱ्याला वाटल्याशिवाय, त्या व्यक्तीला आरोपी मानलं जाणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय. हा तपास 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023' च्या तरतुदींनुसार केला जाईल व गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य तो अहवाल सादर केला जाईल. तपासात कोणताही गुन्हा घडला नसल्याचं आढळून आलं, तर सक्षम न्यायालयासमोर योग्य ती 'समरी' (अंतिम अहवाल) सादर केली जाईल. मात्र, अशा परिस्थितीत, त्या अहवालाला आव्हान देणारी 'निषेध याचिका' दाखल करण्याचा अधिकार याचिकाकर्त्याला असेल, असंही मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी सर्व आवश्यक कागदपत्रं आणि वस्तू सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याकडं सुपूर्द करतील. तसेच, वर नमूद केलेल्या अटींनुसार ही याचिका निकाली काढण्यात येत आहे. याचिका निकाली काढल्यामुळे, त्याच्याशी संबंधित इतर सर्व अर्जही निकाली काढले जात आहेत, असंही मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. 28 ऑगस्ट रोजी राखून ठेवलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयानं 2 सप्टेंबर रोजी जाहीर केला. निकाल जाहीर होताच कोर्टात उपस्थित दिशाचे वडील सतिश सालियन यांनी हात जोडून कोर्टाचे आभार मानले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Source- ETV Bharat Reporter)

'आज अशंत: न्याय मिळाला, आरोपींना अटक होईल तेव्हा समाधान', कुटुंबियांची भावना : या निकालानंतर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिशाचे वडील सतीश सालियन यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र "जोपर्यंत खरे आरोपी जेलमध्ये जात नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. वर्षभर ओरडून सांगतोय, पण मुंबई पोलिसांनी आमच्याकडं लक्ष दिलं नाही," अशी भावना सतीश सालियन यांनी व्यक्त केली. तर त्यांचे वकील नीलेश ओझा यांनी स्पष्ट केलं की, "आज न्यायाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. आदित्य ठाकरेंसह याप्रकरणातील इतर आरोपी ज्या दिवशी अटक होऊन शिक्षा होईल, तेव्हा न्याय होईल," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेतून आरोप केलाय की, आपली मुलगी दिशानं आत्महत्या केलेली नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलीय. आपली तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीत. राज्य सरकारनं आपली बाजू मांडताना कोर्टात स्पष्ट केलंय की, "मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हे केवळ आत्महत्येचंच प्रकरण आहे." तर यात हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आदित्य ठाकरेंच्यावतीनं आपल्याला यात राजकीय वैमनस्यातून गोवलं जात असल्याचा दावा केलाय.

Disha Salian Death Case
दिशा सालियन मृत्यू प्रकरण (ETV Bharat)

राजकीय वैमनस्यातून गोवलं जातंय, आदित्य ठाकरेंचा दावा : आदित्य ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी स्पष्ट केलं की, "याप्रकणी आपल्याला केवळ यात राजकीय हेतूनं गोवण्यात आलंय. त्यामुळे यात आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच कुणाच्याही सांगण्यावरून यात कारवाई करणं योग्य ठरणार नाही. रशीद खान पठाण यांनी तक्रार केली तेव्हा सतीश सालियन यांच्यावतीनं कुठलीही तक्रार दिलेली नव्हती. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे वाट्टेल तसे आरोप करणं हा यामागील मूळ हेतू दर्शवतो. केवळ राजकीय वैरातून सूड उगवण्यासाठीच हे आरोप करण्यात आलेत. दरम्यान याचिकेच्या सुनावणीदरम्यान राणेंच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी केवळ राजकीय हेतूनं प्रेरित होत आपल्यावर आरोप केल्याचंही आदित्य ठाकरेंच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. आम्हाला याचिकाकर्त्यांबाबत पूर्ण सहानभूती आहे. त्यांच्या शंकेचं निरासन होऊन त्यांना त्यांची उत्तर मिळालीच पाहिजेत या मताचे आम्हीही आहोत. दिशाच्या वडिलांच्या बाबतीत पूर्ण संवेदना आहे, पण त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून जे काही राजकारण सुरू आहे ते थांबायला हवं."

दिशाच्या मृत्यूवरून न्यायालयाचे सवाल : पंचनाम्यात दिशाच्या मृतदेहावर कपडे नसल्याच्या उल्लेखावरून शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांना सवाल विचारला. दिशाच्या शरीरावर कपडे नव्हते, असा हॉस्पिटलमधील पंचनाम्याचा उल्लेख आहे?, मग ते कपडे कोणी काढले होते, त्या डॉक्टरांचा जबाब का नाही?, असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला. त्यावर यात काहीही तथ्य नसल्याचं सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केलं. यावर दिशाचा आत्महत्येनंतरचा रुग्णालयातला फोटो सरकारी वकिलांनी कोर्टात दाखवला, यात तिनं कपडे घातले होते. मात्र या फोटोवरूनही कोर्टानं सवाल उपस्थित केला की, एवढ्या उंचावरून पडूनही फक्त तोंडातूनच रक्त आलं?, तोंडावर आणि शरिरीवर बाकी कुठल्याही मोठ्या जखमा का दिसत नाहीत? त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती, तिचा स्कल फ्रॅक्चर होता, जबड्यालाही मोठा मार लागला होता, तसेच अन्यही जखमा होत्या. यावर मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की, "आम्हाला या प्रकरणात आताच कोणतेही निष्कर्ष काढायचे नाहीत. पण यात संशय घेण्यासारखं खरंच काही आहे का?, हे तपासणं महत्त्वाचं आहे."

मुंबई पोलिसांच्या तपासावर सवाल : दिशाचा मृतदेह बंद दाराआडून घडवून तो बाहेर फेकण्यात आला. तिनं 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केला गेला. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशीर केला. दिशाचा मृतदेहदेखील आम्हाला फार काळ ठेवू दिला नाही, घाईघाईत त्याचे अंतिमसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं. घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांचे मोबाईल लोकेशन, सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही, असे आरोप करत या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावरही सवाल उठवण्यात आले आहेत.

सतीश सालियन यांचे काय आहेत आरोप : "दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्टच खरी असल्याचं सतत आपल्यापुढं रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती," असा आरोपही सालियन यांनी आपल्या याचिकेतून केला. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या गेल्याचा दावाही सतीश सालियन यांनी या याचिकेतून केला होता.

आदित्य ठाकरेंवरही याचिकेतून गंभीर आरोप : प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, डिनो मोरिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. याच लोकांनी दिशाचा सामूहिक बलात्कार केल्याचा गौप्यस्फोटही सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वारंवार केलेला आहे. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं. या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला, याच कालावधीत सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेत होता.

याचिकेतील प्रमुख मागण्या : हे सर्व माहिती असूनही राज्याचे प्रमुख या नात्यानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्ती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी आणि एनआयए किंवा सीबीआयमार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, या याचिकेतील प्रमुख मागण्या होत्या.

हेही वाचा :

  1. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; हायकोर्टानं निकाल राखून ठेवला, आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद?
  2. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; हायकोर्टानं निकाल राखून ठेवला, आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद?
  3. "मुलगी गमावलेल्या वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत", सतिश सालियन यांच्या याचिकेवर हायकोर्टाची भूमिका
Last Updated : September 2, 2026 at 3:05 PM IST