'आम्ही बांधकामांच्या विरोधात नाही, परंतु कामं नियमानुसारच व्हायला हवीत'; मुंबई हायकोर्टानं पालिकेला सुनावलं
माहिममधील बांधकामामुळे होणाऱया ध्वनी प्रदूषणावरील याचिकेवरून हायकोर्टाने मुंबई महापालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.

Published : November 5, 2026 at 6:51 AM IST
मुंबई : माहिम येथील इमारतीच्या बांधकामस्थळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी मुंबई पालिकेला खडेबोल सुनावलेत. केवळ नोटिसा काढून चालणार नाही, तर प्रत्यक्षात ठोस कारवाई झालेली दिसली पाहिजे आणि ही कारवाई कागदावर नकोय. पालिकेनं यासंदर्भात ठोस पावलं उचलणं आवश्यक असून ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेणं हे मुंबई महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे, असं हायकोर्टानं अधोरेखित केलंय.
काय आहे प्रकरण? - माहिममधील यशोधन टॉवर पुनर्विकास प्रकल्पाचं काम 24 जुलैपासून सुरू असून सध्या तिथं मोठ्या प्रमाणावर खोदकाम केलं जातंय. बांधकामासाठी 55 डीबी इतकी ध्वनी मर्यादा असतानाही, प्रत्यक्षात प्रकल्पाचं काम सुरू असताना हा आवाज थेट 100 ते 113 डीबीपर्यंत जातोय. या आवाजाचा प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचा दावा करत तेथील रहिवासी अशोक पाठारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी जनहित याचिका दाखल करत दाद मागितली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
हायकोर्टाचे निर्देश काय? - या सुनावणीवेळी पालिकेतर्फे जोएल कार्लोस यांनी संबंधित बांधकामाविरोधात 30 ऑक्टोबर रोजी काम थांबवण्याची नोटीस आणि कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती कोर्टाला दिली. तर माहिम पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचं उल्लंघन होत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितंलं.
जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नये - त्यावर केवळ नोटिसा काढून चालणार नाही, तर प्रत्यक्षात ठोस कारवाई दिसली पाहिजे, असं सुनावत केवळ एका इमारतीविरोधात कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही तर संपूर्ण शहरात प्रत्येक विभागनिहाय देखरेख यंत्रणा उभारली पाहिजे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी ध्वनिप्रदूषणाचे सारे नियम पाळले जात आहेत की नाही? याची खातरजमा करण्याचे आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिलेत. आम्ही बांधकामांच्या विरोधात नाही. मात्र, बांधकाम नियमांनुसारच झाली पाहिजेत. महापालिकेनं आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नये. ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रश्नाचा आढावा घेतला जाईल, असं यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं.
नियमांची अवमानना करणाऱ्यांना परवानगी देऊ नका - हायकोर्ट : बांधकाम व्यावसायिकांना नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा देता येणार नाही. कोणत्याही विभागानं बांधकाम व्यावसायिकांना त्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नये, असंही यावेळी हायकोर्टानं पालिकेला बजावलंय. कुठल्याही प्रकारचा नियमभंग आढळल्यास संबंधित ठिकाणी नोटीस लावून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय संबंधित विकासकानं ध्वनीरोधक बसवून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं पालन करण्याचं हमीपत्र सादर करावं. अन्यथा त्याला बांधकामाची परवानगी देऊ नये, असे निर्देशही हायकोर्टानं पालिकेला दिलेत.
हेही वाचा -
- राज्यात 5.63 लाखांहून अधिक रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
- "न्यायालयात सुनावणी सुरू आहे, नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही", निवडणूक आयोगाच्या 'फॉर्म 6' स्पष्टीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचं मतदारांना आश्वासन
- मालवणीतील 14 अनधिकृत शाळातील विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

