बुरखा सक्ती आणि चुलत भावाशी लग्नाची जबरदस्ती : हैदराबाद सोडून तरुणीनं गाठली मुंबई, उच्च न्यायालयानं दिले 'हे' आदेश
बुरखा सक्ती करुन चुलत भावाशी लग्नाची जबरदस्ती करणाऱ्या पालकांना सोडून हैदराबादची तरुणी मुंबईत आली. त्यानंतर ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली होती.

Published : July 8, 2026 at 11:06 PM IST
मुंबई : जबरदस्तीनं लावलं जाणाऱ्या लग्नाला विरोध करत आपलं उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी हैदराबाद सोडून मुंबईत आलेल्या एका 21 वर्षीय तरूणीला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला. या तरुणीला तिचे पालकच काय तर राज्य सरकारही घरी परत जाण्याची बळजबरी करु शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात बजावून सांगितलं. आपल्या पसंतीनं लग्न करने आणि शिक्षण घेणं हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मुलूभत अधिकार आहे, जो त्याच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालातून स्पष्ट केलंय.
काय आहे प्रकरण : घरातले आपल्याच चुलत भावासोबत जबरदस्तीनं लग्न करायला भाग पाडतायत, हे लक्षात येताच 15 जून रोजी घरातून बाहेर पडलेली ही तरुणी मुंबईत सध्या एका सेवाभावी संस्थेत राहते. ती तिथंच एक नोकरी करून शिक्षण घेत आहे. दरम्यान तिच्या पालकांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार हैदराबाद इथं दाखल केलेली होती. या मुलीचा मुंबईत शोध लागताच ते तिला घरी परत येण्यासाठी धमकावू लागले. मात्र, "आपल्याला आता पुन्हा घरी जायचं नाही. राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या सुरक्षेचे आदेश द्यावेत" अशी मागणी करत या तरुणीनं आपली स्वत:ची हरवलेली तक्रार रद्द करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयानं काय दिले आदेश : या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत प्रत्यक्ष मुलीची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं तिच्या पालकांचंही मत आपल्या न्यायदालनात जाणून घेतलं. मुलीच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र दिलंय की ते तिच्यावर लग्नासाठी बळजबरी करणार नाहीत. मात्र त्यानंतरही मुलगी घरी परत न जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं या तरुणीच्या इच्छेला प्राधान्य देत तिची याचिका मान्य केली. मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय की, "तरुणी सज्ञान आहे, संविधानानं प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या मर्जीनं लग्न करणं आणि आपल्या पसंतीचं शिक्षण घेणं हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे या मुलीला घरी परत जाण्याची सक्ती करता येणार नाही," असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालातून स्पष्ट केलंय. ही तरुणी स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे. तेव्हा तरुणी हरवल्याची तक्रार पोलिसांनी घेऊ नये. तसेच तिच्यावर घरी जाण्याचा आग्रह कोणीही करु नये, असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका निकाली काढली.
बुरखा, नात्यात विवाहाची सक्ती अयोग्य : या प्रकरणावर दिलेल्या निकालात मुंबई उच्च न्यायालयानं काही महत्त्वाच्या मुद्यांवरही भाष्य केलंय. "या तरुणीला तिच्या मामानं दत्तक घेतलेलं आहे. तिला घरातून बुरखा घालण्याची सक्ती तिचे पालक सतत करायचे. तसेच आपल्याच एका चुलत भावासोबत विवाह करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. विवाहासाठी निवडलेला मुलगा हा दहा वर्षांनी मोठा आहे. हे सर्व माहिती असूनही तिच्या घरच्यांना हे मान्य होतं. यावरून हे कुटुंब किती संकुचित मनोवृत्तीच आहे हे स्पष्ट होतंय. या परिस्थितीत तिथं राहणं या मुलीकरता एक मानसिक आघातच होता," असंही मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलंय.
हेही वाचा :

