डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला दणका, मारेकरी शरद कळसकरची हायकोर्टाकडून 50 हजारांच्या जामीनावर सुटका
पुणे सत्र न्यायालयानं जन्मठेप सुनावल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत कळसकर बाहेर आलाय. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता चार आठवड्यांची स्थगिती देण्याची सीबीआयची विनंतीही हायकोर्टाकडून अमान्य केली.

Published : April 29, 2026 at 5:07 PM IST
|Updated : April 29, 2026 at 5:30 PM IST
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयानं 50 हजारांचा जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी आपल्या न्यायदालनात जाहीर केला. पुणे सत्र न्यायालयानं डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपांत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर दोन वर्षांनी हायकोर्टानं शरद कळसकरला जामीन मंजूर केलाय.
निकालाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली - या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता चार आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती तपासयंत्रणा या नात्यानं सीबीआयनं हायकोर्टाकडे केली होती. मात्र ती मान्य करण्यास हायकोर्टानं नकार दिला. याप्रकरणी शरद कळसकर हाच दाभोलकरांचा मारेकरी होता या तपासयंत्रणेच्या दाव्यावर हायकोर्टात प्रलंबित असलेल्या आरोपींच्या अपीलातून सवाल उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे या निकालाला स्थगिती देण्याच प्रश्नच येत नाही, असं स्थगितीची मागणी फेटाळताना हायकोर्टानं अधोरेखित केलंय.

शरद कळसकरची कारागृहातून सुटका होणार - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही शरद कळसकर आरोपी आहे. हा खटला सध्या कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असून ऑक्टोबर 2025 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं शरद कळसकरसह वीरेंद्र सिंह तावडे आणि अमोल काळे यांना त्यात जामीन मंजूर केलाय. मात्र डॉ. दाभोलकर प्रकरणी कैदेत असल्यानं कळसकर अद्यापही कारागृहात होता. मात्र याप्रकरणातही आता जामीन मंजूर झाल्यामुळे शरद कळसकरची कारागृहातील सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
कोणाविरूद्ध चालवण्यात आलाय खटला - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर 11 वर्षांनी या खटल्याचा 10 मे 2024 रोजी निकाल पुणे सत्र न्यायालयाकडून देण्यात आला. प्रत्यक्ष खटला हा 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (सातारा), सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (मुंबई) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ज्यात (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), कलम 34 नुसार शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. खटल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी याप्रकरणी दाभोलकरांचे मारेकरी घोषित करत शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तर इतर सर्व आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष घोषित केलं होतं.
हत्या कधी आणि कशी झाली होती - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी 7:15 च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत तर दुसरी डोक्यात गेली होती. दाभोलकरांच्या या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरलं. पण हत्येचं हे सत्र इथंच थांबलं नाही, त्यानंतर ठराविक कालांतरानं कॉम्रेड गोविंद पानसरे (2015), एम.एम कलबुर्गी (2015) आणि पत्रकार गौरी लंकेश (2017) यांचीही अश्याचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
तपासाची दिशा आणि दशा - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरूवातीला पुणे शहर पोलिसांनी सुरू केला होता. त्यानंतर यात दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) एन्ट्री झाली. मात्र तपास अतिशय संथ आणि असमाधानकारक असल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानं कुटुंबीयांच्या परवानगीनं हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय)कडे सोपवण्यात आला होता. त्यानंतरही यात म्हणावी तशी प्रगती झाली नव्हती. मात्र साल 2018 मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक एटीएसनं पुण्यात येऊन अमोल काळे नावाच्या आरोपीला अटक केली. त्यानंतर याप्रकरणातील धागेदोरे पकडत तपासयंत्रणेला डॉ. दाभोलकर प्रकरणात पहिलं यश मिळालं. पुढे वीरेंद्र तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावेनं डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तर मुंबईस्थित ॲड. संजीव पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येत वापरलेलं पिस्तूल भाईंदरच्या खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. मात्र हे हत्यार परदेशी डायव्हर्स आणूनही तपासयंत्रणेला आजवर सापडलेलं नाही, असं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय.
दोभोलकर कुटुंबीयांच्या अपीलावर सुनावणी प्रलंबित - आपल्या वडिलांची हत्या हा एक सुनियोजित कट होता. सनातन संस्था, हिंदू जन जागरण समिती आणि कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनांविरुद्ध आपलं रोखठोक मत मांडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांना संपवण्यासाठीच हे कारस्थान रचलं गेलं होतं, असा आरोपही मुक्ता दाभोलकर यांनी पुणे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या अपीलामध्ये केला आहे. या खटल्यातील शिक्षा झालेले आणि निर्दोष सुटलेले तिन्ही आरोपी हे उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेचे सक्रिय सदस्य आहेत हा मुद्दा सत्र न्यायालयानं निकालात गृहित धरलेला नाही. न्यायालयाने आरोपींविरोधात गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याचा आणि युएपीएची तरतूद लागू करण्याचा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद करत मोठी चूक केलीय. हे सर्व आरोपी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सक्रिय सहभागी होते. त्यांचा सहभाग दर्शवणारे तपासयंत्रणांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असतानाही ते विचारात घेतले गेले नाहीत. युएपीए अंतर्गत या सर्व आरोपींविरोधात खटला चालवण्याची तपासयंत्रणेला परवानगी मिळाली होती, मात्र तरिही कोर्टानं ते ग्राह्य धरलं नाही असा आरोपही या याचिकेतून केला गेलाय.

