घरात आढळले वृद्ध पती-पत्नीचे कुजलेले मृतदेह, नागपुरातील घटना
वृद्ध दाम्पत्याचा घरात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Published : May 30, 2026 at 10:28 PM IST
नागपूर - शहरालगत असलेल्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दवलामेटी येथे वृद्ध दाम्पत्याचा घरात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दवलामेटी महाडा कॉलनी येथील कॉटरमध्ये वृद्ध दाम्पत्य रहात होते. या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने पोलिसांना बोलावण्यात आले होते. घराच्या बेडरूम आणि स्वयंपाक खोलीमध्ये वृद्ध दांपत्याचे वेगवेगळे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गंगाधर जानबाजी भोंगाडे (75) आणि कौशल्य गंगाधर भोंगाडे (72 ) असे मृतकांची नाव आहेत. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गा प्रकरणातील घातपात किंवा हत्याकांडाचा संशय पूर्णपणे फेटाळून लावला.
भोंगाडे दाम्पत्य एकटेच त्या घरात राहायचे तर त्यांची विवाहित मुलगी नागपुर शहरात दुसऱ्या भागात राहते. शनिवारी वृद्ध दाम्पत्यांनी मुलीशी अखेरचा संपर्क साधला होता. तेव्हापासून त्यांचं कोणाशीही बोलणं झालेलं नव्हतं किंवा ते दोघे परिसरातही कोणालाही भेटले नव्हते.
मृत गंगाधर भोंगाडे हे आयुध निर्माण (डिफेन्स) मधून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते आपली पत्नी कौशल्याबाई यांच्यासोबत वाडी भागात राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली असून, त्या आपापल्या संसारात व्यस्त आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गंगाधर हे बाथरूमजवळ अचानक पाय घसरून पडले असावेत आणि त्यातच ते बेशुद्ध झाले किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा. दुसरीकडे बेडवरून उठण्यास असमर्थ असलेल्या कौशल्याबाई यांना पाणी किंवा जेवण देणारे कोणीहीच उरले नाही. परिणामी अन्न-पाण्याविना भुकेने तडफडून त्यांचाही बेडवरच अंत झाला असावा.
कौशल्याबाई भोंगाडे अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांना बेडवरून उठणेसुद्धा अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत गंगाधर हेच त्यांचा एकमेव आधार होते. तेच पत्नीची जेवणापासून ते सर्व प्रकारची काळजी घेत असे. शुक्रवारी त्यांची एक मुलगी आपल्या पतीसह आई वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आलेली. घराचे दार उघडून आत पाहिले असता तिला आई बेडवर तर वडील बाथरूमचे समोर मृतावस्थेत दिसले.
हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी तातडीने नातेवाईकांना फोन केला. वाडी पोलिसांना देखील तत्काळ घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले होते, तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - नगरपरिषदेकडून मानवतेला काळिमा! अज्ञात मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेला, कचरा डेपोमध्येच पुरला

