मुंबई महानगरपालिका निवडणूक : मुंबईत सर्वाधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Published : January 6, 2026 at 7:41 PM IST
|Updated : January 6, 2026 at 8:22 PM IST
मुंबई : सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरू असताना, या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
879 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 821 पुरुष उमेदवार असून 879 महिला उमेदवार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनें महिला उमेदवार मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.
कोणत्या प्रभागात सर्वाधिक महिला उमेदवार?
देवनार, मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी या भागांमध्ये सर्वाधिक म्हणजेच 68 महिला उमेदवार आहेत. तर वरळी आणि प्रभादेवी परिसरात महिला उमेदवारांची संख्या सर्वात कमी आहे.

प्रभागनिहाय महिला उमेदवारांची संख्या
- देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी – 68
- वडाळा, दादरचे प्रभाग, शीव – 66
- धारावी, महिम, दादरजवळील काही भाग – 59
- अंधेरी पूर्व – 56
- घाटकोपर – 51
- भायखळा, चिंचपोकळी, रे रोड – 50
- अंधेरी पश्चिम – 46
- भांडुप – 45
- मालाड – 42
- मुलुंड - 37
- कुर्ला - 35
- वरळी, प्रभादेवी परिसर - 34
आरक्षण पद्धतीचा दिग्गजांना फटका : मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. महानगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर गेली तीन ते साडेतीन वर्षे मुंबई महानगरपालिकेची निवडणूकच झाली नाही. यंदा पूर्णपणे नव्यानं काढण्यात आलेल्या आरक्षण पद्धतीचा मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांतील अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला.

453 महिला उमेदवारांनी घेतली माघार : नवीन प्रभाग आरक्षण सोडतीमुळं यंदाच्या निवडणुकीत एकाच वॉर्डमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईतील 24 वॉर्डांपैकी काही वॉर्डमध्ये आरक्षण बदलानुसार महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. तर काही ओपन वॉर्ड असूनही तिथे महिला उमेदवाराला संधी देण्यात आलीय. यावेळी एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, 453 महिला उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. माघार घेणाऱ्या एकूण उमेदवारांमध्ये 220 पुरुष आणि 223 महिला उमेदवार आहेत.
आरक्षण सोडतीमुळं महिला नगरसेवकांची संख्या वाढली : माटुंगा, शीव, वडाळा या प्रभागात आरक्षण सोडतीनंतर महिलांची संख्या आठ झाली आहे. तर, पुरुष उमेदवारांची संख्या दोन आहे. 10 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवक महिला असतील. आरक्षण बदलामुळं अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व या प्रभागात एकूण 15 नगरसेवकांपैकी 11 महिला नगरसेवक होणार आहेत. 'आर मध्य' बोरिवली भागातील प्रभागात नगरसेवकांची संख्या 10 आहे. नवीन आरक्षण सोडतीनंतर या वॉर्डमधील महिला उमेदवारांची संख्या 8 झाली आहे. आरक्षण सोडतीमुळंही महिला नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

भाजपकडून सर्वाधिक महिलांना उमेदवारी : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं जाहीर केलेल्या 137 उमेदवारांच्या यादीकडे बारकाईनं पाहिल्यास, या यादीत महिलांना लक्षणीय प्राधान्य दिल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. भाजपाच्या एकूण 137 उमेदवारांपैकी 76 महिला तर 61 पुरुष उमेदवार आहेत. ही संख्या मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या इतिहासातील भाजपाची आतापर्यंतची सर्वाधिक महिला प्रतिनिधित्वाची नोंद आहे. जरी महापालिकेतील 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्या, तरी भाजपानं एक पाऊल पुढं टाकत खुल्या प्रभागांमध्येही महिला उमेदवारांना संधी दिली आहे. खुले प्रभाग हे परंपरेनं अत्यंत प्रतिष्ठेचे आणि चुरशीचे मानले जातात. या प्रभागांमध्ये अनेकदा आरक्षणाचा लाभ नसलेले, ओबीसी किंवा अनुसूचित जमातीच्या कोट्यात न बसणारे पुरुष कार्यकर्ते जोरदार दावेदारी करत असतात. अशा परिस्थितीतही भाजपाकडून महिलांना उमेदवारी देण्यात आल्यानं हा निर्णय विशेष मानला जात आहे. तर शिवेसनेनं 91 जागांपैकी 63 जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2017 : उमेदवारांची संख्या
- एकूण उमेदवार: 2,275
- पुरुष उमेदवार: 1,190
- महिला उमेदवार: 1,084
- 2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांनी तब्बल सुमारे 47.6 टक्के उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत याची संख्या अधिक वाढली आहे.
हेही वाचा :

