राहुल नार्वेकर यांच्याविरोधातील तक्रार मागे; 'मी मात्र लढणार', हरिभाऊ राठोड यांचा निर्धार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधातील एक तक्रार मागं घेण्यात आलीय. मात्र, माजी खासदार हरिभाऊ राठोड हे तक्रार कायम ठेवणार आहेत.

By PTI
Published : January 5, 2026 at 1:22 PM IST
मुंबई - राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. अशातच जवळपास 67 उमेदवार बिनविरोध आल्याने विरोधकांनी सत्ताधारी तसंच निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसंच विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धमकावल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली होती.
जेडी(एस)नं तक्रार घेतली मागं - "मुंबईतील कुलाबा परिसरात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेबद्दल जनता दल (एस) नं आपली तक्रार मागं घेतली आहे," अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिली. नार्वेकर पुढं म्हणाले की, "१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जनता दल (एस) च्या तीन उमेदवारांपैकी दोघांचे नामांकन पत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली तक्रार मागे घेतली."
हरिभाऊ राठोड यांची तक्रार कायम - माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी नार्वेकर यांच्याविरुद्धच्या या प्रकरणात त्यांची वैयक्तिक तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. जेडी(एस) जरी मागं हटलं असलं तरी, राज्य निवडणूक आयोगासमोर माझी तक्रार कायम आहे. तसंच हा लढा अंतिम निष्कर्षापर्यंत नेण्याचा मानस असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं.
राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप - विविध विरोधी पक्षांनी राहुल नार्वेकर यांच्यावर महापालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा, नामांकन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आणि या प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले असून, राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची करण्यात आली आहे.
30 डिसेंबरला काय घडलं? - महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 या तीन प्रभागांतून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले. ते अर्ज दाखल करत असताना राहुल नार्वेकर हेदेखील कुटुंबीय म्हणून तिथं उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारासही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी तिथं अन्य उमेदवारही आपला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते. मात्र, अचानक पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं आणि धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आलं. यावेळी तिथं उपस्थित राहुल नार्वेकरांकडूनच पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप या उमेदवारांसह माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला होता.
हेही वाचा -

