कुलाब्यातील अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देखील धामधूम सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांना कुलाब्यातील तीन प्रभागांमधून उमेदवारी देण्यात आली आहे.


Published : January 8, 2026 at 2:23 PM IST
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपा महायुतीचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी बिनविरोध निकाल लागले, तिथं सत्ताधारी महायुतीनं आर्थिक आमिष, दबाव आणि दहशतीचा वापर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अपक्ष उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देखील धामधूम सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांना कुलाब्यातील तीन प्रभागांमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशात काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्यामुळं इतर पक्षांच्या काही उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. यानंतर आता कुलाब्यातील प्रभाग क्रमांक 226 मध्येही बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपानं अपक्ष उमेदवारावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
मकरंद नार्वेकर यांच्याविरोधात एकमेव अपक्ष उमेदवार : कुलाब्यातील वार्ड क्रमांक 226 मधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं या वॉर्डमध्ये मकरंद नार्वेकर यांच्याविरोधात एकमेव अपक्ष उमेदवार तेजल पवार निवडणूक लढवणार आहेत. मात्र, या लढतीदरम्यान तेजल पवार यांनी नार्वेकर कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या तेजल पवार? : "30 डिसेंबर रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 31 डिसेंबर रोजी छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरल्यानंतर भायखळा परिसरात मकरंद नार्वेकर यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीला एका कारमध्ये बसवून नेलं. त्या कारमध्ये मकरंद नार्वेकर आणि राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मला वेगळ्या कारमध्ये बसवलं. आम्हाला राहुल नार्वेकर यांच्या कफ परेड येथील बंगल्यावर नेण्यात आलं," असा दावा तेजल पवार यांनी केला आहे.
पैशांची ऑफर देण्यात आली : याचबरोबर, तेजल पवार म्हणाल्या की, "बंगल्यावर पोहोचल्यानंतर मी माझी लहान मुलं घरी असल्याचं सांगत तिथून निघून आले. मात्र, माझ्या पतीला पैशांची ऑफर देण्यात आली. यावेळी हा निर्णय पत्नीचा असल्याचं सांगत पतीनं ती ऑफर नाकारली. त्यानंतर मकरंद नार्वेकर यांनी मला फोन करून भेटीसाठी बोलावलं. मात्र, मी येण्यास नकार देत पतीला पाठवण्यास सांगितलं आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय कळवण्याचं स्पष्ट केलं."
पैसे नको, निवडणूक लढवायची आहे : पुढं तेजल पवार यांनी सांगितलं की, "नार्वेकर यांचे पीए घरी येऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समज देत होते. संभाषणादरम्यान त्यांनी 'राजू' नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्याला तडीपार केल्याचं आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं. त्यावर मी, "तुम्ही मला धमकावत आहात का?" असा थेट सवाल केला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 10 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. मात्र, मला पैसे नको असून निवडणूक लढवायची आहे,"असं सांगितल्याचं तेजल पवार यांनी नमूद केलं.
नार्वेकरांविरोधात पोलिसांत तक्रार : या घटनेनंतर तेजल पवार यांनी पती आणि मुलांसह घर सोडून 2 जानेवारीपर्यंत वेगळ्या ठिकाणी राहायला गेल्याचं सांगितलं. तेव्हा नातेवाईकांच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचंही तेजल पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेतील कंत्राटे, रोख पैसे अशा विविध ऑफर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिल्याचा आरोप देखील तेजल पवार यांनी केला आहे. यासंदर्भात तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी नार्वेकरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
इतर पक्षांचा पाठिंबा : विशेष म्हणजे, तेजल पवार यांचे पती दीपक पवार हे शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यांना या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळं त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी तेजल पवार यांच्या तक्रारीबाबत मुंबई आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले : दुसरीकडे, या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "ज्या महिला उमेदवार तेजल पवार माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना मी आजवर कधीही भेटलो नाही. जेव्हा आपली बाजू कमजोर असेल, तेव्हा राजकारणात हे प्रयत्न होतात. एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत कुलाब्यातून मी 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो आहे. प्रभाग क्रमांक 226 मधून मला 14000 मतांचं मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळं कुलाबा मतदारसंघातील तीनही प्रभाग भाजपासाठी सुरक्षित आहेत. त्यामुळं या प्रभागांमधून कोणालाही उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगणं, धमकावणं याचा प्रश्नच येत नाही." दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पाहता वार्ड क्रमांक 226 मधील निवडणूक आता भाजपा विरुद्ध अपक्ष उमेदवार अशी थेट आणि रंगतदार होणार आहे.
हेही वाचा :
- देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
- शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांची रोखठोक भूमिका
- तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण

